मीरा-भाईंदरमध्ये ‘प्रशासकीय राज’ संपले, महापौरांनी पदभार घेतला

भाईंदर: सुमारे साडेतीन वर्षाच्या काळापासून मीरा-भाईंदर महानगरपालिकेवर असलेला प्रशासकीय अंमल अखेर संपुष्टात आला आहे. महापालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींनी आपला कार्यभार स्वीकारला असून, शहरात पुन्हा एकदा ‘जनतेचे राज’ सुरू झाले आहे.

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या निवडून आलेल्या सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ २७ ऑगस्ट २०२२ रोजी संपला. त्यानंतर शहरात प्रशासकीय राजवट लागू करण्यात आली.

२८ ऑगस्ट २०२२ रोजी तत्कालीन महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांची राज्य सरकारने प्रशासक म्हणून नियुक्ती केली होती.
सध्या मीरा-भाईंदर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या असून १५ जानेवारी २०२६ रोजी महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान झाले. १६ जानेवारी २०२६ रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर झाले.

११ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या प्रक्रियेनुसार शहराला नवीन महापौर डिंपल मेहता आणि उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील मिळाले आहेत, ज्यामुळे आता प्रशासकीय राजवट संपून लोकनियुक्त सभागृहाचे कामकाज सुरू झाले आहे. राधाबिनोद शर्मा हे महापालिका आयुक्तपदी कार्यरत आहेत.

प्रशासकीय राजवटीत आयुक्तांच्या माध्यमातून निर्णय घेतले जात होते, मात्र आता स्थानिक नगरसेवक आणि महापौरांच्या निवडीमुळे नागरिकांच्या समस्यांना थेट वाचा फुटणार आहे. यामुळे शहरात आनंदाचे वातावरण असून ‘आपले सरकार’ आल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये आहे. प्रभागातील समस्यांसाठी आता नागरिकांना थेट त्यांच्या नगरसेवकांकडे दाद मागता येईल. शहरातील रस्ते, पाणी आणि कचरा व्यवस्थापनाचे प्रलंबित प्रश्न लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराने मार्गी लागण्याची शक्यता आहे.

प्रशासकीय अधिकाऱ्यांऐवजी आता लोकप्रतिनिधी जनतेला उत्तरदायी असतील. प्रशासकीय काळात विकासकामांची गती मंदावली होती, पण आता लोकप्रतिनिधी आल्याने स्थानिक प्रश्नांची तातडीने सोडवणूक होईल, अशी नागरिकांना आशा आहे. मीरा-भाईंदरच्या या नव्या राजकीय पर्वामुळे शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.