आठ दिवसांची प्रतीक्षा संपली
ठाणे: ठाणे महानगरपालिकेच्या महापौरपदी निवड झाल्यानंतर तब्बल आठ दिवसांनी शर्मिला पिंपळोलकर यांनी बुधवार ११ फेब्रुवारी रोजी आपला पदभार स्वीकारला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्या महापौर खुर्चीवर आसनस्थ झाल्या. यावेळी महापालिका आयुक्त सौरभ राव उपस्थित होते.
ठाणे महापालिकेच्या महापौर
आणि उपमहापौर पदाची निवडणूक 3 फेब्रुवारी रोजी पार पडली. या निवडणुकीत शिवसेनेच्या शर्मिला पिंपळोलकर यांची महापौरपदी तर भारतीय जनता पक्षाचे कृष्णा पाटील यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली होती. मात्र त्यावेळी जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दौऱ्यावर होते. त्यांच्या उपस्थितीतच महापौर पदाचा पदभार स्वीकारणार असे शर्मिला पिंपळोलकर यांनी जाहीर केले होते. गेले आठ दिवस त्या महापौर दालनामध्ये येत होत्या. मात्र महापौर खुर्चीवर बसणे त्यांनी टाळले होते. अखेर आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्याच्या नवनिर्वाचित महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी पदभार स्विकारला.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमहापाैर कृष्णा पाटील, शिवसेनेचे गटनेते पवन कदम यांचेही स्वागत करुन त्यांना नवीन वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेनेचे सचिव राम रेपाळे, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेविका व नगरसेवक उपस्थित होते.