ठाणे : देशातील आंतरराज्य सहकारी बँकांपैकी एक असलेल्या टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेडने मागील आर्थिक वर्षात २३ हजार कोटीपेक्षा जास्त उलाढाल केली असून यावर्षी छत्तीसगड आणि राजस्थान या दोन राज्यात देखील बँकेच्या शाखा उघडण्यात येणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सलग दहा वर्षांहून अधिक काळ दरवर्षी १० एप्रिल रोजी आर्थिक निकाल जाहीर करण्याची परंपरा जपत आज २०२४-२५ या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षित आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. नव्या कोर बँकिंग प्रणालीच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवरही बँकेने सातत्य कायम ठेवत पारदर्शकता आणि वेळेवर सादर केली असून बँकेने २३,१०४.८२ कोटीची उलढाल केली आहे. बँकेकडे १४,८४८.६४ कोटीच्या ठेवी आहेत. ८,२५६.१८ कोटीचे कर्ज वाटप केले आहे. यावर्षी बँकेला ढोबळ नफा २५२.०७ कोटी तर निव्वळ नफा १८५.३८ कोटी झाला आहे, अशी माहिती बँकेचे एमडी आणि सीईओ निखिल आरेकर यांनी दिली. शासकीय कर्मचारी अधिकारी यांचे वेतन, भत्ते आणि निवृत्ती वेतन देण्याची परवानगी राज्य सरकारने दिली असून अशा प्रकारची परवानगी मिळवणारी टीजेएसबी बँक ही पहिली बँक ठरली आहे.
महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या शासन निर्णयामुळे आता बँकेला शासकीय अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्त्यांचे प्रदान करण्यासाठीचे खाते आणि निवृत्ती वेतनधारकांचे वैयक्तिक बँक खाते उघडण्याकरिता; तसेच सार्वजनिक उपक्रम/ महामंडळे यांचेकडील अतिरिक्त निधी गुंतवणूकरिता प्राधिकृत मान्यता मिळाली आहे. यावर्षी टीजेएसबी बँकेमध्ये सिटिझन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, गोवा यांचे यशस्वी विलीनीकरण झाले असून, बँकेच्या नेटवर्कमध्ये सहा नवीन शाखांची भर पडली आहे. बँकेने नवीन कोर बँकिंग प्रणाली अंमलात आणून ग्राहक अनुभव व कार्यक्षमतेत मोठी सुधारणा केली आहे.
टीजेएसबी सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सीए वैभव सिंगवी, मान्यवर संचालक मंडळ सदस्य आणि वरिष्ठ अधिकारी या पत्रकार परिषदेस उपस्थित होते.
टीजेएसबी बँक विषयी: १९७२ मध्ये स्थापनेपासून, टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड ही बहुराज्य अधिसूचित सहकारी बँक ग्राहक-केंद्रित दृष्टीकोन, नाविन्यपूर्ण सेवा आणि मजबूत आर्थिक आधारामुळे ओळखली जाते. सध्या पाच राज्यांमध्ये १४९ शाखांचे विस्तृत जाळे असलेली ही बँक वैयक्तिक ग्राहकांसोबतच व्यवसायिकांच्या पसंतीचीही बँक ठरली आहे.