* लेप्टो, डेंग्यू, मलेरिया रुग्णांसाठी जिल्ह्यात पॅरा मेडिकल पथक सज्ज
* सिव्हील रुग्णालयात अद्ययावत कक्ष
ठाणे : मुसळधार पावसाने साथीच्या आजारांनी डोके वर काढले असून राज्यात लेप्टोस्पायरोसिस, डेंग्यू, मलेरिया आदी आजारांचा प्रादुर्भाव वाढला आहे. ठाणे जिल्ह्यातही दमदार पाऊस होत असून साथीचे आजार डोके वर काढू लागले आहेत. या रुग्णांना सर्वोत्तम आणि वेळेवर उपचार मिळावेत यासाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयात विशेष अद्ययावत कक्षाची स्थापना केली आहे. त्या कक्षात अत्यंत महत्वाच्या औषधांचा साठा, आणि आपत्कालिन ‘पॅरा मेडिकल टीम’देखील सुसज्ज ठेवण्यात आली आहे.
पावसाळयात उद्भवणा-या तापजन्य आणि कावीळ व गॅस्ट्रो अशा रुग्णांसाठी चांगले उपचार मिळावेत यासाठी अद्ययावत कक्ष उभारला आहे. कक्षात उपचारांसाठी लागणारी सर्व आयुधे आणि अन्य सामुग्री सज्ज ठेवली आहे. ठाणे जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले असताना दुसरीकडे साथजन्य आजारांचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या लेप्टोस्पायरोसिस, डेंग्यूसारख्या रुग्णांची संख्या पाहता सर्व रुग्णांना चांगले उपचार मिळावेत यासाठी ‘सिव्हील’ रुग्णालयात विशेष खबरदारी घेण्यात आली.साथीच्या आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी विशेष अद्ययावत कक्ष स्थापन केला आहे आणि विविध औषधांचा साठा, आपत्कालिन पॅरा मेडिकल टीम सज्ज ठेवण्यात आली आहे.
जुलै महिन्यात पावसाने जोरदार बॅटिंग केली असली तरी, राज्याच्या विविध भागात साथीचा आजार वाढतो आहे. यामध्ये ‘लॅप्टोस्पायरोसीस, डेंग्यू आणि मलेरियाचा प्रादुर्भाव वाढताना दिसला. यामुळे ठाणे जिल्ह्यात साथीच्या आजारांची चिंता व्यक्त होत आहे. सरकारकडून साथीचे रोग पसरणार नाही याकरीता खबरदारी घेण्यात आली.
ठाणे जिल्हा आरोग्य प्रशासनाने डेंग्यू व मलेरिया, लेप्टोस्पयरोसिस अशा साथजन्य रुग्णांच्या उपचारांची उत्तम व्यवस्था सिव्हिल रुग्णालयात केली आहे, अशी माहिती ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली.
लेप्टोस्पायरोसिस आणि डेंग्यूची लक्षणे मोठ्या प्रमाणात बदलू शकतात. त्यामध्ये फ्ल्यूसारखी सौम्य लक्षणे ते गंभीर आजारांपर्यंत आहेत. सामान्य लक्षणांमध्ये उच्च ताप, डोकेदुखी, स्नायू दुखणे, थंडी वाजून येणे, उलट्या होणे, कावीळ (त्वचा आणि डोळे पिवळे होणे) आणि डोळे लाल होणे यांचा हमखास समावेश होतो.
पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन यामध्ये डेंग्यूचा धोका वाढतो. उंदरांच्या मुत्रापासून लेप्टोस्पायरोसिस धोका वाढतो. त्यामुळे पावसाळ्यात जास्त दिवस पाणी साचून देऊ नका. तर बाहेर जाताना पायात बुट घालावे आणि तुंबलेल्या पाण्यातून घरी आल्यावर साबणाने स्वच्छ हातपाय धुवावे. कुठे जखम झाली असल्यास ती भिजणार नाही याची काळजी घ्यावी. पाणी उकळून प्यावे अशा काही गोष्टींची काळजी या दिवसांत घेणे गरजेचे आहे, असे डॉ. कैलास पवार यांंनी सांगितले.