पंकज सावंत : पाच गडी बाद
ठाणे : ठाणेवैभव वासंतिक क्रिकेट करंडक स्पर्धेच्या क गटातील १३वा सामना टाइम्स ऑफ इंडियाच्या संघाने जिंकला. सेंच्युरी रेयॉनचा संघ टाईम्सच्या पंकज सावंतच्या भेदक गोलंदाजीपुढे धावांचा डोंगर रचू शकला नाही, त्यामुळे टाईम्सच्या विजयाची वाट सोपी झाली.
सेंच्युरी रेयॉनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. मात्र टाईम्सच्या पंकज सावंतने चार षटकांत २२ धावा देत पाच बळी मिळवले तर अंकित गांधी याने चार षटकांत २७ धावा देत दोन बळी मिळवले. या दोघांच्या भेदक माऱ्यापुढे सेंच्युरी रेयॉन संघाला २० षटकांत आठ गडी गमावून फक्त १२० धावा उभ्या करता आल्या.
टाईम्सच्या चिंतन गडा याने नऊ चौकार ठोकत ४४ धावांचे योगदान दिले तर राकेश पुथरन याने २४ धावा केल्या. सेंच्युरी रेयॉनच्या एकाही गोलंदाजाला मोठी कामगिरी करता न आल्याने टाईम्सने १७ षटकांत १२१ धावा जमवून विजय मिळवला.
दुसरा सामना डिटीडीसी विरुद्ध मफतलाल असा झाला. डिटीडीसी संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली. संघाने २० षटकांत आठ गडी गमावून १६८ धावा केल्या. ओंकार घुले याने सर्वाधिक ४० धावा केल्या. मफतलालकडून करणसिंह नंदी याने सर्वाधिक तीन बळी घेतले.
मफतलालच्या अरमान शेखच्या ६१, उमंग शहाच्या ३३ आणि अहसान जमालच्या २७ धावांमुळे विजयाचा मार्ग सोपा झाला. १९ षटकांत पाच बळी गमावत विजय मिळवला. डिटीडीसीच्या ओंकार घुले आणि वैभव पाटील यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.