परिवहन चालक-वाहक प्रशिक्षणाला ‘तिलांजली’?

भाईंदर : आयुक्त दिलीप ढोले यांच्या मार्गदर्शनानुसार व अतिरिक्त आयुक्त व परिवहन व्यवस्थापक डॉ. संभाजी पानपट्टे यांचे सुचनेनुसार बस ऑपरेटर मे. महालक्ष्मी कृपा इन्फ्रा एलएलपी यांचे वतीने २५ जून रोजी बसचालक यांचे प्रशिक्षण आयोजित केले होते. या प्रशिक्षणामध्ये अपघात कमी करणे, डिझेल मायलेज वाढ करणे, ‘प्रवाशांशी चांगली वर्तणूक ठेवणे’ या विषयी प्रशिक्षण देण्यात आले. पहिल्या सत्रामध्ये ज्या बस चालकांचे अपघात आणि इतर तक्रारी आहेत अशा 32 बस चालकांनी प्रशिक्षण घेतले.

प्रशिक्षणाचे वेळी उपस्थित प्रशिक्षणार्थी बसचालक, उपव्यवस्थापक स्वप्निल सावंत, प्रशासकीय अधिकारी  दिनेश कानगुडे, कनिष्ठ अभियंता सानप व नटे तसेच बस ऑपरेटर संचालक  बोर्जीस, प्रशिक्षक जयंत देशमुख उपस्थित होते. सदर प्रशिक्षणाला महिनाही झाला नाही तोच परिवहन चालक व वाहकांचा मस्तवालपणा प्रवाशांना भोगावा लागत आहे. परिवहनच्या प्रशासकीय कारभाराचा ‘भार’ बालकामगाराच्या हाती देण्यात आल्याने चालक- वाहक परिवहन बस स्वत:च्या मालकीची असल्याचे समजून ‘प्रवाशांना तुच्छतेची’ वागणूक देत असल्याने परिवहनाच्या प्रवासाऐवजी इतर वाहनाने प्रवासी प्रवास करण्यास प्राधान्य देत आहेत.

भाईंदर पश्चिम रेल्वे स्थानकापासून सुटणाऱ्या व चौक येथे जाणाऱ्या परिवहन बस मधून फोटोतील तिकीट तपासणीस  दुपारी १-३० च्या बस ने चालकाच्या शेजारी प्रवासी उतरण्यासाठी असलेल्या दरवाजात उभा राहून प्रवास करीत आहे. सदर तिकीट तपासणीसाकडून सुरू असलेल्या बेशिस्त वागणुकीमुळे प्रवाशांना बस मधून उतरण्यास अडथळा निर्माण होत असतानाही स्वतःच्या मालकीची बस असल्याचे समजणाऱ्या या बेशिस्त तपासणीसावर वातानुकूलित दालनात बसलेल्या पालिका परिवहन उप परिवहन अधिकारी स्वप्निल सावंत कारवाई होत नसल्याने चालक- वाहकही या बेशिस्त अधिकाऱ्यांचा आदर्श ठेवून प्रवाशांना तुच्छतेची वागणूक देत असल्याने प्रशिक्षणाला ‘तिलांजली’ दिल्याचे उघड होत आहे.