तिकीटदर जैसे थे
ठाणे : मागील दोन वर्षात कोरोनाच्या संकटामुळे ठाणे परिवहन सेवेला रोज लाखोंचा तोटा होत आहे. असे असले तरी नवीन वर्षात बसचे तिकीट दर न वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज परिवहनच्या सादर झालेल्या सुमारे ६२१ कोटींच्या अर्थसंकल्पात परिवहन उपक्रमाला उभारी देण्यासाठी अनेक योजना पुढे आणण्यात आले आहेत. तर ४६० कोटींच्या अनुदानाची मागणी ठाणे महापालिकेकडे करण्यात आली आहे.
केंद्राच्या अनुदानातून २०० बसेस, स्वच्छ कृती आराखड्याच्या माध्यमातून ८१ ई बसेस, तीन बस डेपोमध्ये स्वतःचे सीएनजी पंप सुरु करणे तसेच आनंदनगर डेपोमध्ये व्यापारी संकुल उभारणे अशा अनेक घोषणा परिवहनच्या अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी २०० कोटींची वाढ सुचवत ६२०.९० कोटींचा अर्थसंकल्प परिवहनचे सभापती विलास जोशी यांनी परिवहन प्रशासनाला सादर केला. विशेष म्हणजे यावर्षी देखील परिवहनच्या तिकीट दरामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही.
परिवहनच्या बसेसमधून दीड लाखांच्या आसपास प्रवासी प्रवास करीत आहेत. परिवहनचे उत्पन्न जरी २२ लाखांच्या घरात असले तरी परिवहनचा रोजचा खर्च हा सुमारे ३५ लाखांच्या घरात आहे. त्यामुळे परिवहनला रोजच्या रोज १५ लाखांच्या तुटीला सामोरे जावे लागत आहे. प्रवासी भाड्यामध्ये सन 2022-23 मूळ अंदाजपत्रकात 70 बसेस भाड्यापोटी 20 कोटी 70 लक्ष इतके उत्पन्न, जेएनएनयुआरएम अंतर्गत आलेल्या 179 बसेसपासून ५३ कोटी 23 लक्ष, वातानुकुलीत व्होल्वो 22 बसेसपासूनचे उत्पन्न 14 कोटी नऊ लक्ष व महिलांच्या 46 तेजस्विनी बसेसपासून रक्कम नऊ कोटी 40 लक्ष असे एकूण 97 कोटी 42 लक्ष इतके उत्पन्न अपेक्षित घरले आहे. परिवहन उपक्रमांत नव्याने दाखल होणा-या 81 इलेक्ट्रीक बसेस पैकी 20 बसेसपासून आठ महिन्यांकरीता व त्यापुढे 20 बसेसचे चार महिन्यांकरिता सहा कोटी 30 लक्ष असे एकूण रक्कम 103 कोटी 73 लक्ष इतके प्रवासी तिकीट विक्रीचे वार्षिक उत्पन्न अपेक्षित घरले आहे.
बसवरील जाहिरात निविदा प्रक्रीया अंतिम टप्प्यात असून जाहीरात भाड्यापोटी या वर्षी तीन कोटी 14 लक्ष, विद्यार्थी पासेस पोटी एक कोटी 20 लक्ष, निरुपयोगी वाहन वस्तू विक्रीपोटी दोन कोटी, सवलतीपोटी अनुदान (दिव्यांग, जेष्ठनागरीक) करीता 27 कोटी 58 लक्ष, पोलीस खात्याकडून प्रतिपूर्ती पोटी सन 2018-19 पासून प्रलंबित 21 कोटी 52 लक्ष, तसेच इतर किरकोळ उत्पन्न 95 लक्ष असे एकत्रित 56 कोटी 39 लक्ष इतके इतर उत्पन्न अपेक्षित धरले आहे. अशी अंदाजपत्रकातील एकूण महसुली जमा रक्कम रु.160 कोटी 12 लक्ष इतकी अपेक्षित धरण्यात आली आहे.
परिवहनला उभारी देण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात विशेष भर देण्यात आला आहे. यासाठी वागळे, निलकंठ आणि आणखी एका ठिकाणी स्वतःचा सीएनजी पंप सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यापासून उत्पन्न मिळणार आहे. आनंद नगर डेपोमध्ये देखील व्यापारी संकुल उभारून या ठिकाणी उत्पन्न मिळण्याची चिन्हे आहेत.
४६० कोटींच्या अनुदानाची मागणी
कोरोना संकटामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात ठाणे महापालिकेकडून ४६०.५४ कोटी एवढ्या अनुदानाची मागणी करण्यात आली आहे. मागील वर्षी सादर केलेल्या अंदाज पत्रकात परिवहनने २८४.६३ कोटी अनुदानाची मागणी महापालिकेकडून केली होती. परंतु पालिकेने परिवहनसाठी १२२.९० कोटी प्रस्तावित करुन परिवहनच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार केला होता. त्यामुळे यावर्षीही ठाणे महापालिका किती अनुदान देणार हे पाहावे लागणार आहे.
परिवहन सेवेमध्ये ८१ इलेक्ट्रीक बसेस विकत घेण्याबाबतचा प्रस्ताव मंजुर झाला असून केंद्र सरकारतर्फे पर्यावरणाचा समतोल राखला जावा यासाठी महापालिकांना ३८ कोटींचा निधी देण्यात आला आहे. मार्च २०२३ मध्ये या बसेस परिवहनच्या ताफ्यात दाखल होण्याची शक्यता असून यापासून सुमारे सहा कोटींचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे.
- * ठाणे परिवहनच्या ताफ्यातील एकूण बसेसची संख्या-३६४
* परिवहन सेवा स्वतः संचालित करत असलेल्या बसेस-१०८
* कंत्राटी पद्धतीने चालवण्यात येत असलेल्या बसेस-१०८
* तेजस्विनी बसेसची संख्या-५०
* लोकसंख्येनुसार आवश्यक बसेसची संख्या-७५९
* परिवहनचे एकूण मार्ग-१०२
अपेक्षित उत्पन्न
* तिकिटापासून अपेक्षित उत्पन्न-१०३ कोटी
* जाहिरात-कोटी ४ लाख
खर्च आणि थकबाकी
* स्पेअर पार्ट दुरुस्ती खर्च- सहा कोटी ७७ लाख
* कर्मचाऱ्यांची थकबाकी-१५ कोटी
* परिवहन सेवेवरील कर्ज-१७९ कोटी
रस्त्याच्या आणि मेट्रोच्या कामांमुळे परिवहन सेवेला अनेकवेळा बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत, त्यामुळे वाहतूक विभागाशी समन्वय साधून या कामांमुळे परिवहनला फटका बसू नये यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.