नवी दिल्ली: दिल्लीमधील तिहार तुरुंगात कैद असलेला ठग सुकेशने अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांना एक पत्र लिहिलं आहे. सुकेशने त्याच्या परदेशातील उत्पन्नाची माहिती या पत्राद्वारे दिली आहे. सुकेशला त्याच्या परदेशातील उत्पन्नावर ७,६४० कोटी रुपये कर भरायचा आहे. त्याच्याकडे जवळपास २२,४१० कोटी रुपयांची परदेशी संपत्ती असून त्यावर त्याला कर भरायचा आहे. पत्रात त्याने म्हटलं आहे की २०२४-२५ या आर्थिक वर्षात दोन परदेशी कंपन्यांद्वारे ही कमाई केली आहे.
सुकेशने त्याच्या पत्रात म्हटलं आहे की एलएस होल्डिंग्स इंटरनॅशनल (नेवाडा, अमेरिका) व स्पीड गेमिंग कॉर्पोरेशन (ब्रिटिश व्हर्जिन आयलँड्स) या दोन कंपन्यांच्या माध्यमातून त्याने ही बक्कळ कमाई केली आहे. या दोन्ही कंपन्या २०१६ पासून कार्यान्वित आहेत. या दोन्ही कंपन्या ऑनलाइन व ऑफलाइन गेमिंग, तसेच बेटिंगच्या क्षेत्रात काम करतात. सुकेशने म्हटलं आहे की या कंपन्या अमेरिका, स्पेन, ब्रिटन, दुबई व हाँगकाँगसारख्या अनेक देशांमध्ये पसरल्या आहेत. या कंपन्यांच्या माध्यमातून त्यांनी २०२४-२५ या आर्थिक वर्षात तब्बल २.७ बिलियन अमेरिकन डॉलर्स इतकी कमाई केली आहे.
सुकेश केवळ कर भरण्याबाबत बोलून थांबलेला नाही तर, त्याने त्याचे पुढील मनसुबे देखील जाहीर केले आहेत. त्याने त्याच्या पत्रात म्हटलं आहे की त्याला भारतात तंत्रज्ञान व ऑनलाइन स्किल गेमिंगच्या क्षेत्रात गुंतवणूक करायची आहे. त्याने म्हटलं आहे की “मी कमावलेले सर्व पैसे हे कायदेशीर आहेत. मी कायदेशीर मार्गाने संपत्ती मिळवली आहे. मी व माझ्या कंपन्यांनी नेहमीच आंतरराष्ट्रीय बँकिंग कायद्यांचं पालन केलं आहे.
सुकेश चंद्रशेखर हा कोट्यवधी रुपयांचे आर्थिक गैरव्यवहार, पैशांची अफरातफर केल्याच्या आरोपांखाली तिहार तुरुंगात कैद आहे. २०० कोटी रुपयांच्या मनी लॉन्डरिंगच्या प्रकरणांमध्ये सक्तवसुली संचालनालय (ईडी) त्याची चौकशी करत आहे. त्याने रॅनबॅक्सीचे माजी प्रमोटर्स शिविंदर सिंह व मालविंदर सिंह यांच्या पत्नीची २०० कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. यासह दिल्ली पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा व इतर तपास यंत्रणा देखील त्याच्या काळ्या कारनाम्यांचा तपास करत आहेत. यासह सुकेश चंद्रशेखर बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसबरोबरच्या त्याच्या नात्यामुळे प्रसिद्धीझोतात आला होता. त्याच्याविरोधात वेगवेगळ्या तपास यंत्रणांमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत.