दुबई : भारताला २०२३च्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपाठोपाठ श्रीलंकेसह संयुक्तरीत्या २०२६चा ट्वेन्टी—२० विश्वचषक आणि बांगलादेशसह संयुक्तरीत्या २०३१चा एकदिवसीय विश्वचषक या स्पर्धाचे यजमानपद भूषवण्याची संधी मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मंगळवारी जागतिक स्पर्धाची कार्यक्रमपत्रिका जाहीर केली. भारतात २०२९ मध्ये चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचेही आयोजन करण्यात येईल.
तसेच पाकिस्तानात २० वर्षांहूनही अधिक कालावधीनंतर ‘आयसीसी’ची जागतिक स्पर्धा होणार असून २०२५च्या चॅम्पियन्स करंडकाचे यजमानपद भूषवण्याची त्यांना संधी मिळेल. पाकिस्तानाने भारत आणि श्रीलंकेसह संयुक्तरीत्या १९९६चा एकदिवसीय विश्वचषक आयोजित केला होता. तसेच अमेरिका, वेस्ट इंडिजला संयुक्तरीत्या २०२४ ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या आयोजनाची संधी लाभणार आहे.
पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेन्टी—२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा महाअंतिम सामना मेलबर्न येथे १३ नोव्हेंबरला खेळवण्यात येईल, असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मंगळवारी जाहीर केले. १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत एकूण ४५ लढती होतील. नियोजनाप्रमाणे गतवर्षी ऑस्ट्रेलियात विश्वचषकाचे आयोजन करण्यात येणार होते. परंतु करोना साथीमुळे तो पुढे ढकलून २०२२मध्ये खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. एकंदर सात ठिकाणी विश्वचषकाचे सामने होणार असून यामध्ये मेलबर्न, पर्थ, सिडनी, अॅडलेड, ब्रिस्बेन, होबार्ट आणि जीलाँग या शहरांचा समावेश आहे. अमिरातीत झालेल्या विश्वचषकाप्रमाणेच या विश्वचषकाचे स्वरूप असेल. त्यामुळे सध्याचे विजेते ऑस्ट्रेलिया, उपविजेते न्यूझीलंड, भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या आठ संघांनी थेट अव्वल—१२ फेरीत प्रवेश मिळवला आहे. अन्य चार जागांसाठी वेस्ट इंडिज, श्रीलंकाव्यतिरिक्त अन्य सहा संघांत चुरस पाहायला मिळेल.