* एका टिपणीवर १३ स्वाक्षऱ्या
* कार्यवाहीच्या गतीमानतेवर प्रश्नचिन्ह
ठाणे : ठाणे महापलिका प्रशासनाची गतिमान शासनकडे वाटचाल सुरु आहे. त्यामुळे एखाद्या विषयाची टिपणी असो, अथवा प्रस्ताव असो त्यावर आयुक्तांसह महत्वाच्या अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असे अनिवार्य असते. मात्र,
एका-एका टिपणीवर १३ अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात येत असल्याचे आढळून आल्याने आयुक्त अभिजित बांगर यांनी नाराजी व्यक्त करत गतिमान प्रशासनावर प्रश्न उपस्थित केला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केलीच शिवाय टिपणीवर आवश्यक असलेल्या स्वाक्षऱ्यांबाबत नियमावली तयार करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.
आज महापालिकेत झालेल्या बैठकीत एका विषयाची माहिती घेत असताना, आयुक्तांना ही बाब आढळून आली. घोडबंदर रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्या नागरिकांना समता नगर येथील एका जागेवर वसवण्यात आलेल्या वस्तीची दुरवस्था झाली असून त्याचे बायोमेट्रिक सर्व्हेक्षण करण्याबाबत आमदार सरनाईक यांनी बैठकीत मुद्दा उपस्थित केला. यावेळी त्यासाठी लागणाऱ्या खर्चावरून पालिका आयक्त बांगर यांनी प्रश्न उपस्थित केले. हे काम पालिका निधीतून करता येईल का असा प्रश्न उपस्थित करीत त्याबाबतची टिपणी लवकरात लवकर सादर करण्याच्या सूचना दिल्या. याच मुद्द्यावरून पालिका आयुक्त बांगर यांनी एका टिपणीवर आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांच्यासह तब्बल १३ अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या त्यावर घेण्यात येत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेसाठी वेळ अधिक खर्ची पडत असून ती टिपणी आयुक्तांपर्यंत येण्यासाठी आठवडाभराचा कालवधी लागत असल्याची देखील त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे हेच का गतिमान प्रशासन अशा शब्दात अधिकाऱ्यांचे पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी कान टोचले. टिपणीवर आवश्यक असलेल्या स्वाक्षऱ्यांबाबत नियमावली तयार करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.