भयमुक्त वातावरणात ठाणेकर लुटणार मॉर्निंग वॉकचा अनुभव
ठाणे : ठाणेकरांना वाहतूक विभागाच्या पोलिसांनी मराठी नव वर्षानिमित्त आगळीवेगळी भेट दिली असून ठाण्यात तीन रस्ते मॉर्निंग वॉक झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. त्याची अधिसूचना पोलिस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी काढली आहे.
कोविडचे संकट दूर होत चालले आहे. ठाणेकरांची रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी नागरिक सकाळी मॉर्निंग वॉक करतात, परंतु मोठी मैदाने उपलब्ध नसल्याने ठाणेकर नागरिक रस्त्यावर पहाटे ५ ते सकाळी ७ पर्यंत व्यायाम आणि मॉर्निंग वॉक करतात, मात्र त्यांना वेगात जाणाऱ्या वाहनांचा सामना करावा लागतो. कधी कधी अपघात देखील होतात, म्हणून वाहतूक शाखेच्या पोलिसांनी तीन हात नाका येथील सेवा रस्त्याची उजवी बाजू ते धर्मवीर चौक, उपवन तलाव परीसरातील रस्त्याची एक बाजू आणि कोकणी पाडा हिरानंदानी मेडोज पवार नगर हे रस्ते सकाळी ५ ते ८ दरम्यान मॉर्निंग वॉक झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत.
या रस्त्याने कोणत्याही प्रकारची वाहने सकाळी ५ ते ८च्या दरम्यान चालविण्यास मनाई करण्यात आली आहे. या मार्गावरील वाहनांना पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. उपवन आणि हिरानंदानी येथिल दोन रस्त्यापैकी एक रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे तर तीन हात नाका येथून उजवीकडे जाणारी वाहने हरिनिवास सर्कलमार्गे जाणार आहे तर धर्मवीर नाका येथून तीन हात नाकाकडे जाणारी वाहने द्रुतगती मार्गाने इच्छितस्थळी जातील, असे जाहीर करण्यात आले आहे.
३० दिवसांच्या प्रायोगिक तत्त्वावर हे मॉर्निंग वॉक झोन करण्यात आले आहेत, असे श्री. पाटील यांनी स्पष्ट केले.