मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण
ठाणे : महापालिका निवडणुकांना अवकाश असला तरी आतापासूनच मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहरात त्या दृष्टीने हालचालींना वेग आला आहे. याचाच एक भाग म्हणून शहातील तीन चौपाट्या, गावदेवी पार्किंग, २० एसी तसेच ११ इलेक्ट्रिक बसेसचे उदघाटन शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने हा उदघाटन सोहळा महत्वाचा मनाला जात आहे.
मागील पाच वर्षापासून ठाण्यात सात ठिकाणी खाडी किनारा विकास व सुशोभिकरणाअंतर्गत कामे सुरु आहेत. या प्रकल्पातील प्रत्येक चौपाटीला अडथळ्यांची शर्यत पार करावी लागल्याचे दिसून आले. त्यानुसार आता पहिल्या टप्यात कोलशेत चौपाटी ०.५० किमी, कोपरी ०.३३ किमी आणि कळवा ०.२६ किमी परिक्षेत्रात असलेल्या चौपाटीचे लोकार्पण केले जाणार आहे. याशिवाय वागळे इस्टेट भागातील रोड नं. २२ येथील चौक सुशोभिकरणाचे लोकार्पणही करण्यात येणार आहे.
या प्रकल्पांच्या ठिकाणी उद्यान, जॉगींग ट्रॅक, वॉक वे, सायकल ट्रॅक, बैठक व्यवस्था, अॅम्पी थिएटर, मुलांसाठी खेळण्याची व्यवस्था, खुली व्यायाम शाळा, मनोरंजनात्मक सुविधा, गणेश विसर्जन घाट, खाडी लगत धुप प्रतिबंधक गेबियन वॉल, कुंपण भिंत, प्रसाधनगृहे, वाहनतळ आदी सुविधा उपलब्ध होणार आहेत.
ठाणेकरांना प्रतीक्षा असलेल्या गावदेवी पार्किंगचे लोकार्पण देखील यावेळी होणार आहे. ७०० चौरस मीटरवर भूमिगत पार्कींगचे बांधकाम करण्यात आले आहे. याठिकाणी १३० चार चाकी आणि १२० दुचाकी पार्क करता येणार आहेत. यासाठी २७ कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे. कळवा रुग्णालयात नव्याने लेबर वॉर्ड व ऑपरेशन थिएटर तयार करण्यात आलेले आहे. याठिकाणी ३२ खाटांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ठाणे परिवहनच्या ताफ्यात टप्याटप्याने इलेक्ट्रीक बस दाखल होणार आहेत. त्यानुसार नव्याने दाखल झालेल्या ११ इलेक्ट्रीक आणि २० सीएनजी बस शनिवारपासून ठाणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहेत. इलेक्ट्रीक बसचे पहिल्या टप्प्याचे तिकीट १० रुपये असणार आहे.