गॅस सिलेंडरच्या स्फोटात तीन जण जखमी

कल्याण : आंबिवली स्टेशन नजीक मोहने येथील महात्मा फुले नगरमध्ये मंगळवारी सकाळी गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी अनिता जाधव (38), महिमा जाधव (१२) आणि विजय तांडेल (४८) यांना अधिक उपचारासाठी मुंबईतील सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

स्फोटामुळे घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, घरातील देव्हारा, घड्याळ, रँकवरील भांड्यांसह दरवाजा तुटून पडला. या घटनेने नागरिकांमध्ये खळबळ पसरली. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाने तत्काळ धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी येथील रहिवाशांनी जखमींना रुग्णालयात घेऊन जाण्यास मदत केली.

दरम्यान, स्थानिक रहिवाशांनी गॅस एजन्सीविरोधात वारंवार तक्रारी केल्याचे समोर आले आहे. चुकीचे सिलेंडर वितरण, गळतीविषयी दुर्लक्ष, तसेच देखभालीच्या अभावामुळे अशा घटना वारंवार घडत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत दोषींची चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. यानिमित्ताने अधिकृत गँस एजन्सीकडून केली जाणारी तपासणी, दुरूस्ती प्रश्न ऐरणी आला आहे.

या दुर्घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून, सुरक्षेसाठी अधिक उपाययोजना करण्याची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटने संदर्भात कल्याण डोंबिवली अग्निशमन दलाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्राथमिक माहितीनुसार गँस सिलेंडर गळतीमुळे संदर्भीत घटना घडल्याचे सांगितले.