अंबरनाथमध्ये भाजपाकडून तीन शहराध्यक्ष नियुक्त

अंबरनाथ : अंबरनाथ शहर भाजपा नेतृत्वात बदल करण्यात आला आहे. विश्वजीत करंजुले-पाटील, प्रजेश तेलंगे आणि लक्ष्मण पंत या तीन जणांची शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पक्षांतर्गत मंडल अध्यक्ष बदलण्याच्या प्रक्रियेनुसार अंबरनाथ शहर अध्यक्ष पदाच्या नियुक्त्या करण्यात आल्या. अंबरनाथ पूर्वच्या अध्यक्षपदी विश्वजित करंजुले-पाटील यांची तर पश्चिमेला प्रजेश तेलंगे आणि लक्ष्मण पंत या दोन जणांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजपा प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार अंबरनाथ विधानसभा निवडणूक प्रमुख गुलाबराव करंजुले-पाटील यांच्या उपस्थितीत निरीक्षक संजय आदक यांनी पूर्व आणि पश्चिम भागातील विश्वजित करंजुले-पाटील, लक्ष्मण पंत, प्रजेश तेलंगे यांची अध्यक्षपदी नियुक्ती केल्याचे जाहीर केले.

शहरातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विश्वासात घेऊन, त्यांची मते जाणून घेऊनच अध्यक्षपदी नियुक्त्या करण्यात आल्याचे प्रतिपादन गुलाबराव करंजुले-पाटील यांनी सांगितले.

येत्या काळात अंबरनाथमध्ये भाजपा एक नंबरचा पक्ष असेल आणि अंबरनाथ नगरपालिकेमध्ये भाजपाची सत्ता हमखास आणणार असल्याचा दावा श्री. करंजुले यांनी यावेळी केला.