चौघांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल
अंबरनाथ: डॉक्टर असल्याचे भासवून एका ज्येष्ठ नागरिकावर उपचार करून दोन लाख 80 हजारांची फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चार जणांविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
शहराच्या पूर्व भागात राहणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाला संधिवाताचा त्रास होता. याबाबत त्यांनी त्यांच्या ओळखीच्या व्यक्तिमार्फत ज्येष्ठ नागरिकाने डॉ. मर्चंट यांना फोन केला आणि घरी उपचारासाठी बोलावले. युनानी उपचार पद्धती असल्याचे सांगून मर्चंट यांनी चार ते पाच दिवस उपचार दिले. यात ज्येष्ठ नागरिकाच्या पायाच्या पोटरीच्या खाली ब्लेडने जखमा करून त्यातून पिवळ्या रंगाचे पित्त व रक्त काढले असल्याचे भासवले. आणि त्यांच्याकडून दोन लाख ८१ हजार रुपयांची रक्कम उकळली. या उपचाराबाबत ज्येष्ठ नागरिकाच्या मुलाला संशय आल्याने त्यांनी डॉ. आर. मर्चंट, कुसुम मेहता, डॉ. राज मर्चंट, मोहम्मद आसिफ अशा चौघांविरोधात येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
संबंधित डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल केला असून लवकरच या प्रकरणाचा तपास लावला जाईल, असे शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी सांगितले.