तीन हात नाका सिग्नलमुक्तीकडे!

* यु फ्लायओव्हर्सचा उतारा
* लवकरच निविदा निघणार

ठाणे : मुंबई, गुजरात, नाशिक आणि ठाण्याकडे ये-जा करणाऱ्या लाखो वाहनांमुळे नेहमीच कोंडीत अडकलेला तीन हात नाका लवकरच यु फ्लायओव्हर्स आणि सिग्नल कपातीमुळे मोकळा होणार आहे. लवकरच या कामाच्या निविदा निघणार असून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे इंधन आणि वेळेची मोठी बचत होणार आहे.

ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक मोठ्या ट्रॅफिक जंक्शन्सपैकी एक, सर्वप्रकारच्या वाहनांना त्रासदायक असलेले प्रत्येकी दीड मिनिटांचे ६ सिग्नल अशी ‘ख्याती’ असलेल्या ‘तीन हात नाका’ची ओळख पुसली जाऊन ‘सात जंक्शन्स ’म्हणून ओळख होणार आहे. येथे ‘सिग्नल फ्री कॉरिडॉर’ उभारण्यासाठी एमएमआरडीएने मान्यता दिली आहे. त्यापैकी चार कॉरिडॉरवर सर्वाधिक वाहतूक होणार असली तरी, उड्डाणपुलांमुळे वाहनांचा रस्ता सिग्नलपासून मुक्त असेल.

सध्याच्या पुलांच्या व्यतिरिक्त ‘यु’आकाराचे फ्लायओव्हर्स बांधून आत्ताची जंक्शन्स ओलांडावी  लागणार नाहीत आणि सर्व प्रकारची वाहने किमान अडीच मिनीटे अवधीच्या सिग्नलपासून मुक्त होतील, अशी माहिती अधिका-यांनी दिली.
ठाणे महापालिकेकडून सन 2014 च्या केलेल्या अभ्यासात हे जंक्शन जगातील सर्वात ‘अव्यवस्थित’ ठिकाणांपैकी एक म्हणून ओळखले गेले होते.

तीन हात नाका जंक्शन मार्ग हा दररोज पहाटेपासून सध्या मध्यरात्रीनंतरही लहान-मोठ्या अवजड वाहनांनी गजबजलेला असतो. हा वाहतुकीचा रस्ता तब्बल अन्य ४८ रस्त्यांना जोडलेला आहे. तब्बल १६ लाख वाहने ‘तीन हात’हून त्यांच्याठिकाणी मार्गस्थ होतात. येथे वर्षाकाठी तीन हजार लहान-मोठे अपघात होतात, असे सूत्रांकडून कळते.

भविष्यातील फ्लायओव्हर्सच्या प्रस्तावानुसार प्रत्येकी तीन लेनसह आणि एकत्रितपणे अंदाजे 289 कोटी रुपये खर्चांचा प्रस्ताव गेल्या महिन्यात एमएमआरडीए समितीसमोर मांडण्यात आला आणि अखेरीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंंडळाने (एमएसआरडीसी) दोन दशकांपूर्वी या जंक्शनवर उड्डाणपूल बांधला असला तरी, त्याखालील आणि मुंबई-ठाण्याला एलबीएस रोडने पूर्व द्रुतगती हायवेसह जोडणा-या लेनमधील वाहतुकीच्या वाढत्या हालचालींमुळे प्रवास असह्य झाला आहे.

‘सिग्नल फ्री कॉरिडॉर’मुळे होणारे फायदे
* ‘सिग्नल फ्री कॉरिडॉर’ येत्या दोन वर्षांमध्ये उभारला जाणार आहे. यावर दोन नवीन ‘यु टर्न’ उभारले जाणार असल्यामुळे सध्याच्या वाहतुकीला शिस्त लागेल आणि सध्याचे दोन सिग्नल्स हटवले जाणार  आहेत, अशी माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी ‘ठाणेवैभव’ला दिली.
* नौपाडा-कोपरी रस्त्यावरुन वागळे  इस्टेटकडे जाणारी वाहने डावीकडे वळून नवा ‘यु टर्न’ वापरतील आणि एलबीएस मार्ग अथवा महामार्गाने घोडबंदरकडे जातील.
* वागळे इस्टेटमार्गे (एलबीएस मार्ग) येणारी वाहने डावीकडे वळून ‘यु टर्न’ महामार्गावर उतरतील आणि मुंबई किंवा ठाणे शहराकडे  जातील.
* या रचनेमुळे मुंबईकडून नाशिककडे आणि नाशिकहून मुंबईकडे उड्डाणपुलाखालून जाणारी वाहतूक सिग्नल नसल्यामुळे थेट जाऊ  शकतील.