धुराचा त्रास थांबणार, प्रकल्पासाठी दोन कोटींचा निधी
ठाणे: पारंपारिक अंत्यविधीमुळे स्मशानभूमी परिसरात नेहमी धूर आणि दुर्गंधीचा त्रास रहिवाशांना होत असतो. त्याचबरोबर पर्यावरणालाही बाधा निर्माण होत असते. ठाणे शहर आता स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करत असताना शहरातील ग्रामीण भागात तीन गॅस शवदाहिन्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासाठी दोन कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
ठाणे महापालिकेने ग्रामीण भागातील स्मशानभुमींमध्ये गॅस शवदाहिनी बसवण्याचा निर्णय घेतला आहे. पातलीपाडा, गायमुख आणि माजिवाडा या स्मशानभुमीमध्ये या गॅसशवदाहिन्या बसवल्या जाणार आहेत. यासाठी दोन कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या स्मशानभुमींमध्ये आजही लाकूड जाळून अंत्यसंस्कार केले जात आहेत. मात्र या गॅस शवदाहिन्यांमुळे वायू प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.
पालिका हद्दीत सध्या ३६ स्मशानभुमी आहेत. या स्मशानभुमीमध्ये पूर्वीपासून लाकूड जाळून अंत्यविधी केली जात आहे. या सर्वच स्मशानभुमींना दुरुस्तीची गरज असल्याने पालिकेने एकात्मिक विकास प्रकल्पातर्गत त्यांच्या नुतनीकरणाचे काम हाती घेतले आहे. पण केवळ स्मशानभुमीचे नुतनीकरण करून धुरामुळे होणारे प्रदूषण रोखता येणार नाही. ही बाब लक्षात आल्यामुळे पालिकेने टप्प्या टप्प्याने स्मशानभुमींमध्ये गॅस शवदाहिनी बसवण्याची मोहिम हाती घेतली आहे.
केवळ जवाहरबाग अणि वागळे येथे विद्युत शवदाहिनी आहेत. तर माजिवाडा येथे डिझेलवरील शवदाहिनी उपलब्ध आहे. विद्युत शवदाहिनीचा पर्याय चांगला असला तरी वीजबिलाचा खर्च परवडणारा नाही. म्हणूनच पर्यावरण संरक्षण उपक्रमांतर्गत आलेल्या केंद्राच्या निधीतून पालिकेने ग्रामीण भागातील तीन स्मशानभुमींमध्ये सीएनजी, एलपीजी गॅसदाहिनी बसवण्याचा निर्णय घेतला आहे.
पातलीपाडा, गायमुख आणि माजिवाडा येथे या गॅसशवदाहिन्या बसवल्या जाणार आहेत. स्मोक न्यूसन्स अबेटमेंट सिस्टीम म्हणजे धुराचा उपद्रव कमी करणारी यंत्रणा या शवदाहिन्यांमध्ये असणार आहेत. त्यामुळे प्रदूषणाला आळा घालण्यास मदत होणार आहे.