कळव्यात अज्ञातांनी पहाटे सहा रिक्षा फोडल्या

जयभीम नगरमध्ये गर्दुल्ले आणि मद्यपींची दहशत

ठाणे : कळव्यातील जयभीम नगर परिसरात रविवारी पहाटे अज्ञात व्यक्तींनी सहा रिक्षा फोडल्या आहेत. या परिसरात गर्दुल्ले, चरसी तसेच मद्यपींचा मोठा वावर असून त्यांनीच हा प्रकार केला आहे, असा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.

यासंदर्भात कळवा पोलीस स्थानकात तक्रार करण्यात आली आहे. मात्र यापूर्वीही असे प्रकार घडले असून पोलिसांकडून कठोर कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

कळवा जयभीमनगर हा संपूर्ण झोपडपट्टीचा परिसर आहे. स्थानिक नागरिक तसेच काही जण बाहेरून येऊन या ठिकाणी रिक्षा रात्री पार्क करून ठेवतात. रविवारी पहाटे या परिसरातील तब्बल सहा रिक्षांची अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली आहे. ज्यांच्या रिक्षा फोडण्यात आल्या आहेत त्यांनी कळवा पोलीस स्थानकात तक्रार केली असून पोलीस सीसीटीव्ही तपासण्याचे काम सुरू केले आहे.

अशाप्रकारे गाड्या फोडण्याची वर्षभरातील ही तिसरी घटना असून याशिवाय या ठिकाणी चोरी आणि घरफोडयांचे प्रमाण देखील वाढले आहे. या सर्वांच्या मागे परिसरात फिरणारे गर्दुल्ले आणि चरसी लोक असून या लोकांचा बंदोबस्त करण्याची वारंवार मागणी नागरिक पोलिसांकडे करत आहेत. मात्र पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई होत नसल्याने गर्दुल्ले अणि चरसी लोकांची हिंमत वाढली आहे. दुसरीकडे महापालिकेने बसवलेले सीसीटीव्ही देखील बंद असल्याने या परिसरातील नागरिक दहशतीखाली आहेत.