तीन दिवस आणि ४८ नाले; उल्हासनगरात पुराचा धोका!

नालेसफाईच्या निविदा प्रक्रियेत गटांगळ्या

उल्हासनगर: सर्व महानगरपालिका क्षेत्रात नालेसफाईची डेडलाईन ही 31 मे पर्यंत निश्चित करण्यात आली आहे. मात्र उल्हासनगरातील नालेसफाईचा मुहूर्त अद्याप लागलेला नाही. पावसाळा तोंडावर आला आहे. ४८ नाल्यांची सफाई तीन दिवसांत झाली नाही तर नाले तुंबून शहरात पूरस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

दरवर्षी एप्रिल महिन्याच्या शेवटी किंवा मे महिन्याच्या सुरवातीला सुरू होणारी नालेसफाई यंदा निविदा प्रक्रियेत अडकून राहिलेली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नालेसफाईचे कंत्राट शुभम कन्स्ट्रक्शनच्या वतीने हाताळले जात आहे. यावेळी नालेसफाईच्या दोन निविदा भरण्यात आल्या आहेत.

यासंदर्भात पालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी यापूर्वीच निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितलेले आहे. या निविदेला एक-दोन दिवसात मंजुरी मिळताच शहराच्या मधोमध वाहणाऱ्या 48 मोठ्या नाल्यांची सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ.सुभाष जाधव,अधिकारी मनिष हिवरे,विनोद केणी,एकनाथ पवार यांच्या देखरेखीखाली पोकलेन, जेसीबी मशीनच्या सहाय्याने युद्धपातळीवर सफाई केली जाणार आहे. यासोबतच शहरात सर्व वस्त्यात असणाऱ्या लहानसहान नाल्यांची मनुष्यबळ लावून सफाई करण्यात येणार असल्याचे लेंगरेकर यांनी स्पष्ट केलेले आहे.