मुंबई: भारतीय हवामान खात्याने वायव्येकडून देशामध्ये येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे कोकण, गोव्यासहीत मुंबईमध्ये पुढील तीन दिवस उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा दिला आहे.
आकाश निरभ्र राहणार असून आर्द्रता कमी असल्याने उष्णतेमध्ये प्रचंड वाढ होणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पुढील तीन ते चार दिवस नागरिकांनी उन्हात फिरताना अधिक काळजी घ्यावी असं सांगण्यात आलं आहे. यासंदर्भातील पत्रकच हवामान खात्याने जारी केले आहे.
१४, १५, १६ मार्च रोजी पालघर, ठाणे, मुंबई, रायगडमध्ये उष्णतेच्या लाटेचा समान प्रभाव जाणवणार आहे. १४ आणि १५ तारखेला सर्वाधिक जास्त उष्णता असेल तर १६ तारखेला तुलनेने कमी उष्णता असली तरी सतर्क राहण्यास सांगण्यात आलंय. पुढील दोन दिवस म्हणजेच १७ आणि १८ मार्च रोजी वातावरण कोरडं राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये १४ तारखेला सर्वाधिक उष्णता जाणवेल तर १५ आणि १६ तारखेलाही तुलनेने कमी पण नेहमीपेक्षा अधिक उष्णता जाणवण्याची शक्यता आहे. या दोन्ही जिल्ह्यांमध्येही इतर जिल्ह्यांप्रमाणे वातावरण पुढील काही दिवस कोरडं असेल, असा अंदाज आहे.
सोमवार १४ मार्च रोजी सकाळ पासूनच वातावरणात उष्णता जाणवू लागली होती. दुपारी ३.३०च्या दरम्यान, ठाणे शहरात ४१ अंश तापमानाची नोंद झाली होती. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी सांगितले की, दुपारच्या वेळेस घराबाहेर पडणे टाळावे. तहान नसली तरी जास्तीत जास्त पाणी प्यावे. हलके, पातळ व सुती कपडे वापरावेत. बाहेर जाताना सनग्लासेस, स्कार्फ, छत्री, टोपी यांचा वापर करावा. प्रवासा दरम्यान पाण्याची बाटली सोबत ठेवावी, उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किवा छत्रीचा वापर करावा तसेच ओल्या कपड्याने डोके, चेहरा झाकावा असे त्यांनी सांगितले.