मुंबई : राज्यभरातून शिवसेनेच्या शिंदे गटाला भरभक्कम पाठिंबा मिळत असतानाच नवी मुंबईत शिंदे गटाचे तीन नगरसेवक भाजपचे गणेश नाईक यांच्या गोटात गेले आहेत.
नवी मुंबईतील भाजपचे आमदार गणेश नाईक यांच्या उपस्थितीत तिघा नगरसेवकांनी भाजपचा झेंडा हाती धरला. नवीन गवते, अपर्णा गवते आणि दीपा गवते यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
डिसेंबर २०२१ मध्ये नवी मुंबईतील भाजप नगरसेवकांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होत. भाजपच्या १४ नगरसेवक- नगरसेविकांनी शिवसेना किंवा राष्ट्रवादीची वाट धरली होती. नवीन गवते, अपर्णा गवते आणि दीपा गवते यांनी तत्कालीन मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवबंधन हाती बांधले होते. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाराष्ट्रात सत्तांतर झाले आणि शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. त्यामुळे राजकारणातील बदलत्या वाऱ्याची दिशा ओळखून तिन्ही नगरसेवकांनी भाजपमध्ये घरवापसी केल्याचे दिसत आहे.