भाईंदर: काशिमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कदम यांना काही इसम गांजा घेऊन काशिमिरा पोलीस ठाणे हद्दीत विक्री करण्याकरीता येणार असल्याची गुप्त बातमी मिळाली. त्यांनी पो. निरीक्षक कुमारगौरव धादवड (गुन्हे) व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे स.पो.निरीक्षक प्रशांत गांगुर्डे व कर्मचारी यांना कारवाई करणेबाबत आदेश दिले.
या पथकाने घोडबंदर गावाचे हद्दीत जुना बंद टोल नाक्याजवळ पाळत ठेवून अभिषेक वाघ (२५) रा. दहीसर पुर्व, मुंबई, अभिषेक सिंग, (२०) रा. नायगांव पुर्व, जिल्हा पालघर, कुलदीप सिंग (२५) रा. नायगांव पुर्व जिल्हा पालघर यांना रिक्षा क्र. एम. एच. ४८ बीएफ. ५६४६ सह ताब्यात घेतले. सदर रिक्षाची झडती घेतली असता त्यात चार प्लास्टीकच्या गोण्यांमध्ये चार लाख २० हजार रुपये किंमतीचा ४२ किलो गांजा हा अंमली पदार्थ’ आढळून आला.
अटक केलेल्या आरोपीतांकडे केलेल्या चौकशीत त्यांनी गांजा ओरिसा येथून विक्रीसाठी आणला असल्याची माहीती दिली. आरोपींकडून ४२ किलोग्रॅम वजनाचा गांजा तसेच गुन्हयात वापरलेली रिक्षा (क्र. एम. एच. ४८ बीएफ ५६४६) असे मिळुन चार लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींविरुध्द काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक आरोपी पोलीस कोठडीत आहेत.