ठाणे: अनधिकृत इमारतीवर तोडक कारवाई करण्यासाठी गेलेल्या पालिका अधिकार्याकडून साहित्य हिसकावून धमकी दिल्याचा प्रकार दिवाजवळील डावले गावात घडला आहे. या प्रकरणी डायघर पोलिस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल झाला.
अनधिकृत बांधकामांची पंढरी म्हणून कळवा, मुंब्रा आणि दिव्याची ओळख आहे. दिवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त अक्षय गुडधे हे मंगळवारी ५ मार्चला डावले गाव येथील भुमापन क्रमांक ९५ च्या एका इमारतीवरील पाचव्या मजल्याचे अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी गेले होते. यावेळी इमारतीचे विकासक मोहम्मद कुरेशी यांचा हस्तक आणि त्याचे दोन साथीदार तेथे आले. या तिघांनी पालिका कर्मचारी तसेच सहायक आयुक्त अक्षय गुडधे यांना धमकावण्यास सुरुवात केली. त्यांच्या हातातील निष्कासनाचे साहित्य हिसकावून धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. या गंभीर प्रकारामुळे पालिकेने डायघर पोलिस ठाण्यात शाहिद शेख, रॉनी उर्फ रौनक शेख आणि अय्याज शेख या तीन आरोपींविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.