२० हजार मीटरचा वापर शून्य तर १० हजार मीटरचा वापर ३० युनिटच्या आत
ठाणे : शीळ, कळवा आणि मुंब्रा भागात ३० हजाराहून जास्त वीज मीटर संशयास्पद आढळून येत आहेत. या मीटरची तपासणी करण्यासाठी टोरंट कंपनीमार्फत विशेष मोहीम सुरू करण्यात येत असून मीटरमध्ये फेरफार केल्याचे आढळून आल्यास संबंधित ग्राहकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
कळवा, शीळ, मुंब्रा भागात वीजचोरीचे प्रमाण वाढल्याचे वेळोवेळी मिळत असलेल्या आकडेवारीवरून आणि घटनांवरुन दिसत आहे. यास पुष्टी देणारे दाखले पुढे येऊ लागले आहेत. या भागात २० हजाराहून जास्त वीज मीटरचा वापर शून्य आढळून येत असून दहा हजारापेक्षा जास्त वीज मीटर चा वापर शून्य ते ३० युनिटपर्यंत आढळून येत आहे. त्यामुळे या मीटरबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाल्याचे टोरंट प्रलशासनाकडून कळते.
या संशयास्पद मीटरच्या वस्तुस्थितीची पडताळणी करण्यासाठी विशेष तपासणी मोहिमेचे आदेश देण्यात आले आहेत. अपवादात्मकपणे कमी वापर असलेल्या ग्राहकांसाठी घरोघरी भेटी देऊन, ग्राहकांनी मीटरमध्ये गैरप्रकार केले असल्यास, ते ओळखण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापैकी काही खरी प्रकरणे असू शकतात, ज्यात ग्राहकांकडून विजेचा खप वास्तविक कमी आहे. तथापि, शून्य किंवा कमी वापर दर्शविणाऱ्या मीटरची सध्याची संख्या खूप जास्त आहे आणि मीटर बायपास, मीटरमध्ये छेडछाड, थेट/अनधिकृत वापर इत्यादीसारख्या गैरप्रकारांमध्ये काही ग्राहक गुंतलेले असतील याची शक्यता नाकारता येत नाही, वा काही दोषी आढळ्यास टोरंटद्वारे दोषींविरुद्ध विद्युत कायदा 2003 च्या संबंधित मार्गदर्शक तत्त्वांनुसार लागू कारवाई केली जाईल.
वीजचोरी हा फौजदारी गुन्हा आहे वा वीजचोरी आढळल्यास गुन्हेगाराला तीन वर्षांपर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. टोरंटने ग्राहकांना विद्युत उपकरणांमध्ये हस्तक्षेप करून विजेचा अनधिकृत वापर न करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे असुरक्षित विजेचे जाळे निर्माण होते आणि त्यामुळे विद्युत अपघात होऊन जीवितहानी देखील होऊ शकते, असे प्रशासनाने म्हटले आहे.