धोकादायक इमारती हजारावर; ‘वागळे’करांची मदार क्लस्टरवर

लोकमान्य-सावरकरनगर प्रभागात २२१ धोकादायक इमारती

ठाणे : लोकमान्यनगर-सावरकरनगर प्रभागामध्ये सुमारे २२१ इमारती धोकादायक अवस्थेत आढळल्या आहेत. तर वागळे प्रभाग समितीमध्ये तब्बल १०६१ इमारती धोकादायक आढळल्या आहेत. विशेष म्हणजे वागळेत एकही अतिधोकादायक इमारत नसून लोकमान्यनगरमध्ये मात्र अतिधोकादायक सहा इमारती आढळल्या आहेत.

पावसाळ्यात धोकादायक इमारती कोसळून जीवितहानी होण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांपासून ठाण्यात घडत आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून दरवर्षी धोकादायक इमारतींची यादी प्रसिद्ध करण्यात येते. त्यापैक सी- १ म्हणजे अतिधोकादायक इमारती तत्काळ जमिनदोस्त करण्यात येतात. सी- १ ए मधील म्हणजे धोकादायक इमारती रिकाम्या करून त्याची संरचनात्मक परिक्षण करण्यात येते.  त्यानुसार प्रशानाने प्रभाग समितीनिहाय यादी प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली असून लोकमान्य-सावरकर नगरमधील पहिली यादी जाहिर केली आहे. या प्रभागसमितीमध्ये २२१ इमारती धोकादायक अवस्थेत आढळल्या आहेत. गेल्यावर्षी ही संख्या २१७ इतकी होती. तर अतिधोकादायक इमारतींची संख्या सात वरून सहा झाली आहे. जाहिर केलेल्या अतिधोकादायक इमारतींच्या रहिवाशांना तत्काळ घरे रिकामी करण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत. तर दुरुस्ती करून राहण्याजोग्या उर्वरित इमारतींनाही नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

किसननगर, श्रीनगर, शांतीनगर, वागळे इस्टेट इत्यादी परिसर असलेल्या वागळे प्रभाग समितीमध्ये हजारो जुन्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. त्यामुळे ठाण्यातील क्लस्टरचा पहिला नारळ किसनगरमध्ये फुटला. असे असतानाही या प्रभाग समितीमध्ये एकही अतिधोकादायक इमारत पालिकेच्या सर्वेक्षणात आढलेली नाही. १०६१ धोकादायक इमारतींमध्ये तीन इमारती रिकाम्या करून दुरुस्त करण्याच्या सुचना दिल्या आहेत. तर सात इमारतींना किरकोळ दुरुस्ती आणि उर्वरित सर्व इमारतींना तत्काळ दुरुस्तीच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.