`अटल संध्या’ कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
बदलापूर : प्रसिद्ध पार्श्वगायक सोनू निगमच्या जादुई स्वरांवर हजारो बदलापूरकर थिरकले. भाजपा व `कपिल पाटील फाऊंडेशन’कडून आयोजित केलेल्या `अटल संध्या’ कार्यक्रमात रसिकांनी जादुई स्वरांबरोबरच हास्यजत्रेतील विनोदी व बहारदार नृत्यांची अविस्मरणीय मैफल अनुभवली.
बदलापूर येथील आदर्श महाविद्यालयाच्या प्रांगणात रविवारी सायंकाळी रंगलेल्या `अटल संध्या’ कार्यक्रमाला हजारो रसिकांची गर्दी झाली होती. दरवर्षी होणाऱ्या `अटल संध्या’ कार्यक्रमातील गर्दीचा नवा उच्चांक काल प्रस्थापित झाला. सोनू निगमच्या स्वरांबरोबरच प्रसिद्ध हास्य कलाकार समीर चौगुले, चेतना भट, पृथ्वीक प्रताप, शिवाली परब यांच्या विनोदी सादरीकरणाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. तर अभिनेत्री स्मिता गोंदकर, श्रुती मराठे यांच्या बहारदार नृत्यावेळी मैदानातील रसिकांनीही ठेका धरला. सुमारे पाच तास रंगलेल्या या सोहळ्याचे सूत्रसंचालन अभिनेत्री स्पृहा जोशी यांनी केले होते. तत्पूर्वी भाजपाचे कार्यकर्ते सुनिल मेणे यांनी श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या कवितांचे सादरीकरण केले.
दिग्गज गायक सोनु निगम यांना प्रत्यक्ष मैदानात ऐकण्यासाठी सायंकाळी चारपासून रसिकांची गर्दी झाली होती. सोनु निगम यांचे रंगमंचावर जल्लोषात व टाळ्यांच्या कडकडाटात आगमन झाल्यानंतर पुढील दोन तास रसिकांनी स्वर्गीय व सदाबहार सुरांचा आनंद घेतला. दिवाना तेरा, यू आर माय सोनिया, दिल डूबा, दिल दिवाना आदींसह असंख्य गीतांवर हजारो बदलापूरकर थिरकले. ऑल इज वेल, दिल मांगता है, बिजूरीया, तुमसे मिल के दिल का, हसती रह तू… अशा गीतांनी वातावरण सूरमयी झाले होते.
तत्पूर्वी, केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी रसिकांचे स्वागत केले.
`अटल संध्या’च्या माध्यमातून बदलापूरकरांना दर्जेदार कार्यक्रम देण्यात येतील. यंदाच्या कार्यक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद दिल्याबद्दल कपिल पाटील यांनी बदलापूरकरांना धन्यवाद दिले. या कार्यक्रमासाठी सिद्धेश पाटील यांनी प्रेक्षकांसाठी बाल्कनी उभारल्याबद्दल कौतुक केले. यापुढील काळात आणखी प्रेक्षकांना कार्यक्रम पाहता यावा, यासाठी बाल्कनी उभारली जाईल, असे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी जाहीर केले. या कार्यक्रमाच्या यशस्विततेसाठी प्रयत्न करणारे देवेश पाटील, सुमित पाटील, सिद्धेश पाटील यांच्यासह भाजपाच्या कार्यकर्त्यांचे त्यांनी कौतुक केले.
या वेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, जिल्हाध्यक्ष मधुकर मोहपे, रामभाऊ पातकर, राजेंद्र घोरपडे, शरद तेली, संजय भोईर, आशिष दामले, प्रविण राऊत, प्रभाकर पाटील, धनराज गायकवाड यांच्यासह प्रमुख नेते-कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.