मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधकांवर बरसले
नागपूर : महाविकास आघाडी सरकारच्या काळात हनुमान चालीसा वाचणाऱ्या आमदाराला आणि त्यांच्या खासदार पत्नीलाही जेलमध्ये टाकले. पत्रकार अर्णब गोस्वामी आणि राहुल कुलकर्णी यांनाही जेलमध्ये टाकले. गिरीश महाजन यांचा पूर्ण कार्यक्रम केला होता. आमच्या सरसकट चौकशा लावण्याचे त्यावेळी पाप केले होते. तेच विरोधक आमच्यावर कायदा-सुव्यवस्था बिघडल्याचा आरोप करत आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुफान फटकेबाजी केली.
हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर टीकेचा भडीमार केला. मुख्यमंत्री म्हणाले की, अडीच वर्षात तुम्ही विदर्भासाठी कोणता निर्णय घेतला? विदर्भातील शेतकरी चांगल्या गाडीतून फिरला पाहिजे. विमानातून शेतकरी फिरला पाहिजे. तालुक्यांत विमानतळ सुरु करतोय. मुख्यमंत्री कसा हेलिकॉप्टरने शेतावर जातो म्हणून हिणवलं. दुसरा मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने जाणारा दाखवा आणि बक्षिस मिळवा असे म्हटले. मी तर म्हणतो मागचे मुख्यमंत्री कधी घराबाहेर पडले हे दाखवा आणि बक्षिस मिळवा, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणाले की, काही न करता तुम्ही लोकांना आतमध्ये टाकले होते. सूडबुद्धीने कोणतीही कारवाई हे सरकार करणार नाही. चर्चेमध्ये नक्षलवाद संदर्भात ही उल्लेख करण्यात आले. तीन महिला नक्षल्यांना अटक केली. गृहमंत्री स्वतः पालकमंत्री आहेत. आम्ही राज्यातून नक्षलवाद संपवून टाकणार आहोत, असं ते म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणाले की, महापुरुषांचा अपमान केला म्हणून तुम्ही आमच्यावर टीका केली. मात्र शिवाजी महाराज यांच्या वंशजाकडे पुरावे कोणी मागितले? महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे तैलचित्र तुम्ही लावू शकला नाहीत, पण आम्ही ते लावले. बाळासाहेब ठाकरे यांचेही तैलचित्र लावण्याचे काम आम्ही केले. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधून लोकांना मदत करत आहोत. महापुरुषांच्या अवमानासंदर्भात गंभीर चर्चा केली आहे. कायद्यात काही सुधारणा करता येतील का या संदर्भात ही निर्णय घेतला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री म्हणाले की, जिल्हा पातळीवर आम्ही मुख्यमंत्री कार्यालय सुरु करत आहोत. शक्ती कायदा हा केंद्राकडे पाठवला आहे. त्यावर लवकर निर्णय होईल, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले की, एनआयटीचा घोटाळा काढला. कुठे बैठका झाल्या हे ही मला माहीत आहे. काय निघाले त्यात? सुतावरुन स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न तुम्ही केला. मी हात दाखवायला कशाला जाईन? ज्याला हात दाखवायचा होता, त्याला दाखवला आहे. हे सरकार आपला कालावधी पूर्ण करेल. आम्ही आणि भाजप एकत्र निवडणूक लढवू, असेही मुख्यमंत्री म्हणाले.