दक्षता पथक नेमण्याचे आयुक्तांचे आदेश
ठाणे: ठाणे शहरातील मुख्य रस्त्यांवर डेब्रिज टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याने शहराच्या सौंदर्यीकरणास बाधा येते आहे. त्यामुळे डेब्रिज टाकणाऱ्यांवर वचक बसण्यासाठी दक्षता पथक नेमण्याचे आदेश ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील शहर सौंदर्यीकरण प्रत्यक्षात आणण्यासाठी ठाणे महापालिका काम करत आहे. या कामाचा ठाणे महापालिका आयुक्तांमार्फत दर आठवड्याला आढावा घेतला जातो. सोमवारी झालेल्या बैठकीत आयुक्तांनी डेब्रिज आणि उद्यान सुशोभीकरण याबद्दल स्पष्ट आदेश दिले. या बैठकीस, शहर अभियंता प्रशांत सोनग्रा, उप शहर अभियंता शुभांगी केसवानी, कार्यकारी अभियंता विकास ढोले आदी अधिकारी उपस्थित होते.
तीन हात नाका जंक्शन, नितीन कंपनी जंक्शन, कॅडबरी जंक्शन, माजिवडा जंक्शन तसेच अन्य काही ठिकाणी जाहिरात हक्क तत्वावर सुशोभिकरण करण्यात आलेले आहे. तेथील उद्यानाचे सुशोभिकरण एक महिन्यात नव्याने केले जावे, असे निर्देश आयुक्त श्री. बांगर यांनी जाहिरात विभागाला दिले. त्याच बरोबर, या चौकांमधील वाहतूक बेटांवर सध्या असलेली शिल्पे बदलून वैविध्यपूर्ण, आकर्षक शिल्पे बसविण्याच्या सूचना ही आयुक्तांनी दिल्या.
शहर सौंदर्यीकरणाचे काम गतिमान होण्यासाठी प्रभागनिहाय कार्यकारी अभियंता यांनी डेब्रिज उचलण्यासाठी तत्काळ डंपर आणि मनुष्यबळ उपलब्ध करावे, असेही निर्देश श्री. बांगर यांनी दिले. तसेच, कॅडबरी कंपनी जंक्शन येथे उड्डाणपुलाच्या खाली डेब्रिज टाकणाऱ्याचा शोध घेवून त्याच्यावर दंडात्मक कारवाई करावी, असे आदेश श्री. बांगर यांनी दिले.
बेवारस वाहनांवर कारवाई
स्वच्छतेच्या मोहिमेचा पुढील भाग म्हणून ठाणे महापालिकेने बेवारस गाड्या उचलण्याची कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत, वागळे इस्टेट परिसरातून ३२ आणि कोपरी मधून १९ बेवारस वाहने उचलण्यात आली आहेत. त्यात जुन्या रिक्षा, छोटा हत्ती टेम्पो, दुचाकी गाड्या आणि गाड्यांचे सांगाडे, चारचाकी हातगाड्या यांचा समावेश आहे.
या भागाचे सर्वेक्षण केल्यानंतर जी वाहने बेवारस स्थितीत आढळली त्यांच्यावर नोटिसा लावण्यात आल्या. नोटीसची मुदत संपल्यावर या गाड्या उचलण्यात आल्या, असे परिमंडळ उपायुक्त शंकर पाटोळे यांनी सांगितले.