आमच्यावर टीका करणाऱ्यांचेच दिल्लीश्वरांसमोर लोटांगण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला

ठाणे: दिल्लीश्वरांसमोर लोटांगण घालतात, असे आम्हाला म्हणणारेच आता दिल्लीश्वरांसमोर लोटांगण घालत आहेत, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

बाळासाहेब होते तेव्हा एक दबदबा होता, अख्खी दिल्ली बाळासाहेबांना भेटायला मातोश्रीवर यायची, आता उलट झालेले आहे. मातोश्रीलाच दिल्लीच्या चकरा माराव्या लागत असून हे महाराष्ट्राचे दुर्दैव असल्याची टीका यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. तर रस्ते दुरुस्तीमध्ये हलगर्जीपणा झाल्यास संबंधितांवर एफआयआर दाखल करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले आहे.

जिल्ह्यातील रस्ते दुरुस्ती आणि वाहतुकी कोंडीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी सकाळी आनंद नगर चेकनाक्यापासून शहापूरपर्यंत रस्त्यांची पाहणी केली. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. उद्धव ठाकरे सध्या दिल्लीच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यावरून मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. जेव्हा बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडले, तेव्हा अशाच प्रकारच्या चकरा, फेऱ्या आणि लोटांगण तुम्हाला घालावे लागत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

आज उद्धव ठाकरे यांची सभा ठाण्यात होत असून या सभेवरूनही मुख्यमंत्र्यांनी ठाकरे यांना डिवचले आहे. ठाणे हा धर्मवीर आनंद दिघे यांचा बालेकिल्ला आहे. लोकसभेत आम्ही तो राखला, ठाण्यामध्ये आता काय आहे? उबाठा ठाण्यात खालसा झालेला आहे, खालसा झालेल्यांमध्ये काय जीव भरणार, त्यामुळे त्यांनी आपला मोर्चा दुसरीकडे वळवला तर चांगले आहे, असा टोला त्यांनी ठाकरे यांच्या ठाण्यात होणाऱ्या सभेवरून लगावला आहे.

मुख्यमंत्र्यांनी जयंत पाटील यांच्यावरही तोफ डागली आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही कुठलंच काम करत नाही, गेल्या दोन अडीच वर्षाचा जर कारभार बघितला तर दोन वर्षांमध्ये आम्ही केलेली कामे जनतेसमोर आहेत, या महाविकास आघाडीने बंद पाडलेली कामे, जे स्पीड ब्रेकर मारले होते, ते सगळे आम्ही काढले, सर्व विकास प्रकल्पांना चालना दिली, विकास कामांबरोबरच आम्ही कल्याणकारी योजना देखील आणतोय, एकीकडे विकास आणि दुसरीकडे कल्याण याची एकत्रित सांगड आम्ही घातली आहे, त्यामुळे आम्हाला निवडणुकांची धास्ती, चिंता नाही. निवडणुका कधीही होऊ द्या, या राज्यातली जनता आमच्या कामावर शिक्कामोर्तब करतील, कामाची पोचपावती देतील असे मुख्यमंत्री म्हणाले.

विरोधक आता लाडका शेतकरी योजनेबाबत जी टिंगल करत आहेत, मला त्यांना सांगणं आहे की मी देखील एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा आणि वेदना आम्हाला समजतात, म्हणून शेतकऱ्यांसाठी वर्षाला आम्ही सहा हजार रुपये थेट त्यांच्या खात्यात देतो. एक रुपयात पीक विमा योजना आम्ही त्यांना दिली, त्याचबरोबर आता साडेसात एचपीच्या पंपाचं वीज बिल आम्ही माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मागेल त्याला सोलर, मागेल त्याला शेततळे अशा अनेक योजना आम्ही शेतकऱ्यांसाठी आणलेल्या आहेत. ज्यांनी हे लाडका शेतकरी वक्तव्य केले आहे, त्यांच्या काळामध्ये लाडका डान्सबार मात्र होता. त्यामुळे लाडका डान्सबार आणि त्यातून काय काय पुढे झालं हे मला तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजनेमुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहेत, ते बिथरलेले आहेत, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यांना पराभव समोर दिसू लागलेला आहे, त्यामुळे अशा प्रकारचे ते वक्तव्य करत आहेत असा टोला मुख्यमंत्र्यांनी यावेळी लगावला.