ओएलएक्सवर चोरट्या वाहनांची विक्री करणारे अटकेत

कल्याण : डोंबिवली, कल्याण परिसरात गेल्या काही महिन्यांपासून दुचाकी, रिक्षा चोरीच्या १५ ते २० घटना घडल्या आहेत. विविध पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांचा तपास सुरू असतानाच, महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने चोरीच्या दुचाकी, रिक्षा बनावट कागदपत्रांच्या आधारे ओएलएक्स उपयोजनवर विक्री करणाऱ्या दोन जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चार लाख ५० हजार रुपये किमतीच्या दुचाकी, रिक्षा अशी ११ वाहने जप्त करण्यात आली आहेत.

डोंबिवली, कल्याण परिसरात आतापर्यंत वाहनांच्या चोऱ्या याच आरोपींनी केल्याचा संशय पोलिसांना असून अन्य भागातील वाहन चोऱ्या त्यांच्याकडून उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. दोन्ही आरोपींनी १४ चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

मोहंमद अकबर अब्दुल अजीज शेख (२७), अबुबकर उर्फ जुनेद उर्फ जाफर अब्दुल अजीज शेख (२२) अशी अटक आरोपींची नावे आहेत. कल्याण जवळील बेकायदा बांधकामांचे आगर असलेल्या आडीवली-ढोकळी गावातील राम रेसीडन्सी संकुलात ते राहतात. कल्याण पूर्व भागातील संतोषनगरमध्ये राहणारे सुजित घाडगे यांनी त्यांची दुचाकी कल्याण पश्चिमेतील पत्रीपुला जवळील सर्वोदय मॉलसमोर उभी केली होती. ते काम संपवून परत आले तर त्यांची दुचाकी जागेवर नव्हती. आजुबाजुला तपास घेतला दुचाकी न सापडल्याने महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.

या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांना बैलबाजार येथे एक जण बुलेटची विक्री करण्यासाठी येणार आहे अशी गुप्त माहिती मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्यासह पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, साहाय्यक निरीक्षक देविदास ढोले, दिपक सरोदे, उपनिरीक्षक संजय जगताप यांनी बैलबाजार भागात सापळा लावला.

ठरल्या वेळेत एक इसम बुलेट घेऊन तेथे घुटमळू लागला. पोलिसांना संशय आला. हाच आरोपी म्हणून एका पोलिसाने त्याला हटकले. तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. तात्काळ त्याला पोलिसांनी घेरले. त्याने आपले नाव मोहम्मद अकबर अब्दुल अजीज शेख असल्याचे सांगितले. त्याच्या जवळील बुलेट त्याने डायघर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरली आहे. या बुलेटची बनावट कागदपत्रे तयार करुन ही कागदपत्रे, तसेच बुलेटचे छायाचित्र ओएलएक्स उपयोजनवर स्थापित करून विक्री करणार आहे, अशी माहिती पोलिसांना दिली.

मोहम्मद शेख याने चौकशी दरम्यान त्याचा साथीदार सख्खा भाऊ अबुबकर उर्फ जुनेद शेख याचाही या चोरी प्रकरणात समावेश असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यालाही मोहम्मदने दिलेल्या पत्त्यावरून अटक केली.

वाहन विक्री पध्दत

दुचाकीची चोरी केल्यानंतर तिचे छायाचित्र ओएलएक्स उपयोजनवर टाकले जायचे. दुचाकी विकत घेणाऱ्या व्यक्ती बरोबर दुचाकी किंमतीचा व्यवहार करुन त्यांना दुचाकीचे बनावट आरसी बुक, बनावट आधारकार्ड देऊन वाहन विक्री केली जात होती. मोहम्मद शेख सराईत गुन्हेगार आहे. त्याच्या विरुध्द यापूर्वी दुचाकी चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत. दोन्ही भावांनी महात्मा फुले चौक, कोळसेवाडी, अंबरनाथ, शिवाजीनगर, शिळ-डायघर पोलिस ठाण्यांमध्ये दाखल वाहन चोरीच्या १४ गुन्ह्यांची कबुली दिली.

त्यांच्याकडून दोन बुलेट, एक ॲव्हेन्जर, एक यूनिकॉर्न, एक डीओ, एक रिक्षा, पाच पल्सर अशी चार लाख ५० हजार रुपयांची ११ वाहने हस्तगत करण्यात आली आहेत, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक होनमाने यांनी दिली.