थॉमस-उबेर चषक बॅडमिंटन स्पर्धा : भारतीय पुरुषांकडून नेदरलँड्सचा धुव्वा

आहस (डेन्मार्क) : भारतीय पुरुष संघाने ‘क’ गटातील साखळी सामन्यात नेदरलँड्सचा ५-० असा धुव्वा उडवत थॉमस आणि उबेर चषक बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली.

पुरुष संघाकडून आघाडीचा खेळाडू किदम्बी श्रीकांतने जोरान क्वीकेलला २१-१२, २१-१४ असे सरळ गेममध्ये पराभूत केले. भारताची प्रमुख दुहेरीची जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी अपेक्षित कामगिरी करताना रूबेन जिले आणि टाईस वॅन डर लेकचा २१-१९, २१-१२ असा सहज पराभव केला. जागतिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या बी. साई प्रणीतने एकेरीच्या दुसऱ्या सामन्यात रॉबिन मेस्मानला २१-४, २१-१२ अशी सहज धूळ चारली. त्यामुळे भारताला एकूण लढतीत ३-० अशी विजयी आघाडी मिळाली.

यानंतर दुहेरीत एम. आर. अर्जुन आणि ध्रुव कपिला यांनी अँडी बुइक आणि ब्रायन वासिंकवर २१-१२, २१-१३ अशी, तर एकेरीतील अखेरच्या सामन्यात समीर वर्माने गिस दुइसवर २१-६, २१-११ अशी मात केली. आता मंगळवारी होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघापुढे ताहितीचे आव्हान असेल.

महिलांची स्कॉटलंडशी लढत

उबेर चषकात मंगळवारी भारतीय महिला बॅडमिंटन संघाची लढत स्कॉटलंडविरुद्ध होणार आहे. भारतीय महिलांनी रविवारी स्पेनला ३-२ असे पराभूत करत या स्पर्धेची विजयी सुरुवात केली होती. परंतु या लढतीतील पहिल्या सामन्यात भारताची आघाडीची खेळाडू सायना नेहवालला दुखापत झाली. तिला सामना अर्ध्यातच सोडावा लागला. त्यामुळे ती स्कॉटलंडविरुद्ध खेळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.