यंदा पावसाळ्याआधीच होणार ठाणेकरांची खड्ड्यांपासून सुटका

* नगरविकास विभागाकडून २१४ कोटींचे अनुदान
* ५२ किमीचे १२७ रस्ते होणार चकाचक

ठाणे : पावसाळ्यात ठाणेकरांना खड्डेमुक्त रस्ते मिळावेत यासाठी ठाणे महापालिकेने आत्तापासूनच तयारी सुरू केली आहे. नगरविकास विभागाने दिलेल्या २१४ कोटींच्या अनुदानातून या रस्त्यांचा विकास केला जाणार आहे. त्याची सुरुवात देखील करण्यात आल्याने ठाणेकरांना पावसाळ्यातील खड्ड्यांपासून मुक्ती मिळण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातील रस्त्यांचा विकास करण्यासाठी नगरविकास विभागाचा विशेष निधी या रस्त्यासाठी दिला आहे. रस्त्यांची कामे हाती घेताना खड्ड्यांचे हॉट स्पॉट असलेले रस्ते प्राधान्याने निवडले गेले आहेत. त्याअंतर्गत शहरातील तिन्ही उड्डाणपुलांच्या चढण-उतारावरील रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. ज्या चौकातील रस्त्यांवर खड्डे पडतात त्या चौकात अस्फाल्ट तंत्रज्ञान वापरून गुळगुळीत रस्ते तयार करण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत.

सर्व नऊ प्रभाग समित्यांमधील ५२.८३० किमीचे १२७ रस्ते या उपक्रमांतर्गत दुरुस्त करण्यात येणार आहेत. त्यासाठी पालिकेने रस्त्यांची यादी तयार केली आहे. त्यानुसार एकूण २७.७८७ किलोमीटर लांबीचे ३४ रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी ८२.५९ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करणे तसेच नाले व सी. डी. वर्कच्या कामासाठी ३५ कोटी ७९ लाख रुपयांची तरतूद आहे. एकूण  २,१०५ किमीच्या १२ रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. तर युटीडब्लूटी पद्धतीने ८१ रस्त्यांचे मजबुतीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी ९५ कोटी ६२ लाख रुपये खर्चून २२. ९३९ किमीचे रस्ते हायटेक बनणार आहेत.

किसननगर अंतर्गत दोन कोटी, आयटीआय सर्कल एक कोटी, श्रीनगर-शांतीनगर दोन कोटी, भटवाडी दोन कोटी ७० लाख, रामनगर दोन कोटी, वारली पाडा, कैलासनगर दीड कोटी, अल्मेडा चौक उड्डाणपूल-एक कोटी ३५ लाख, बॉम्बे बियर-एक कोटी ६० लाख, प्रभाग क्रमांक १८- दोन कोटी, समता नगर -तीन कोटी, घोडबंदर डी मार्ट ते नवीन कासारवडवली पोलीस स्टेशन-चार कोटी ६० लाख घोडबंदर रोड ते साईनाथ सोसायटी- एक कोटी ९० लाख, शिवाजीनगर एक कोटी २८ लाख, प्रभाग क्रमांक तीन अंतर्गत रस्ते दोन कोटी, मोघरपाडा एक कोटी १० लाख