यंदा पाऊस १०६ टक्के बरसणार

भारतीय हवामान विभागाचा पहिला अंदाज

नवी दिल्ली: एकीकडे सूर्य मुंबई ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्राला भाजून काढत असताना दिलासा देणारी बातमी भारतीय हवामान विभागाने दिली आहे. यावर्षी सरासरीहून अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. देशात सरासरीच्या 106 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सोमवारी (15 एप्रिल) पावसाचा अंदाज वर्तवत ही माहिती दिली. भारतीय हवामान विभागाने हा पहिला अंदाज वर्तवला आहे. यंदा मान्सून सामान्यपेक्षा अधिक राहणार आहे. महाराष्ट्रात देखील यंदा मान्सून चांगला राहणार आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रात चांगला पाऊस होईल, असं भाकीत हवामान खात्याने वर्तवले आहे.

महापात्रा म्हणाले, यंदा सामान्यहून अधिक पावसाचा अंदाज आहे.५ जून ते 30 सप्टेंबर दरम्यान 106 टक्के पाऊसाचा अंदाज आहे. यंदा सामान्यपेक्षा चांगली परिस्थिती आहे. 8 जूनपर्यंत मान्सून येण्याची स्थिती आहे. अल निनोची परिस्थिती सध्या मॉडरेट आहे. पावसाळा सुरू झाल्यावर अल निनोचा प्रभाव संपला असेल. अल निनो लचा प्रभाव कमी होत आहे.

पाऊस मोजण्याची श्रेणी कशी ठरते?

हवामान विभागाने पावसाच्या प्रमाणाच्या अशा पाच श्रेणी ठरवल्या आहेत. त्यानुसार 90 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस म्हणजे अपुरा पाऊस समजला जातो. दुसऱ्या श्रेणीत 90 ते 95 टक्के म्हणजे सरासरीपेक्षा कमी पाऊस, तर तिसऱ्या श्रेणीत 96 ते 104 टक्के म्हणजे सामान्य सरासरी इतका पाऊस समजला जातो. पुढील दोन श्रेणी सरासरीपेक्षा अधिक म्हणजे 105 ते 110 टक्के आणि 110 टक्क्यांच्या पुढे अधिक पाऊस म्हणजे सर्वाधिक पाऊस समजला जातो. यंदाच्या हंगामात तिसऱ्या श्रेणीतील पावसाचे भाकीत करण्यात आले आहे.