पावसाळ्यात अशी राखा केसांची निगा

पावसाळ्यात केसांची नीट काळजी घेतली नाही तर केसांवर महागड्या ट्रीटमेण्ट घेण्याची गरज पडते. त्यामुळे केसांचे आणखीनच नुकसान होते. हे होऊ नये यासाठी पावसाळ्यात केसांची काळजी घेणं हाच योग्य उपाय आहे.

जर कधी पावसाने केस भिजले तर पूर्णपणे मोकळे सोडून ते लगेच सुकवावे. जास्त वेळ केस ओले राहिले तर केस दुर्बळ होतात आणि गळण्याचे प्रमाण वाढते.

आठवड्यातून किमान दोन वेळा केसांना खोबरेल तेल कोमट करून लावणे जरुरीचे आहे. साधारणतः दोन वेळा केमिकल विरहित शॅम्पूने केस धुवावे. खोबरेल तेलाने केसांचा शुष्कपणा कमी होतो. ओल्या केसांमुळे केस दुभंगण्याचे प्रमाण वाढते. केसांची टोकेपण दुभंगतात म्हणून कोमट खोबरेल तेल लावावे. केस सुकवताना कधीही उलटे करून झटकू नये. त्यामुळे केस गळण्याचे प्रमाण वाढते. मोकळे केस वेगवेगळे विभाग करून कोरड्या टॉवेलने पुसावे. त्यातील ओलेपणा कमी करावा. हेअर ड्रायरचा उपयोग कमी करावा कारण हेअर ड्रायरच्या उष्ण हवेने केस दुर्बळ होतात.

केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी सकस चौरस आहार घेणे आवश्यक आहे. तणावरहित जीवन असावे. त्याचबरोबर किमान ७ ते ८ तास झोप आवश्यक आहे.

दुभंगलेली टोके असलेले केस नियमितपणे टोकांच्यावर कापणे आवश्यक आहे.

वयोमानाप्रमाणे केस पांढरे होणारच ते स्वीकारा. रंग (डाय) लावायचा असेल तर तो केमिकल विरहित (मेहंदी) लावावा.

– डॉ. शिरीष कुलकर्णी

त्वचारोगतज्ज्ञ