ठाणे: महाराष्ट्राला जातीपातीत नासवण्याचे काम सुरू आहे. तेव्हा, तुम्ही कोणत्याही जातीचे असा पण, जोपर्यत तुम्ही हिंदु म्हणून विचार करणार नाही; हिंदु म्हणुनच मतदान करणार नाही, तोपर्यत या राज्याला, या देशाला उभे करू शकणार नाही, असे परखड मत माध्यम विश्लेषक सुशील कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
ठाण्यातील सरस्वती शाळेच्या पटांगणात सुरु असलेल्या ३८ व्या रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेत “महाराष्ट्रातील सद्य राजकिय परिस्थिती” या विषयावरील व्याख्यानात कुलकर्णी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सत्राचे अध्यक्ष मकरंद मुळे, विजय जोशी आणि व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आमदार संजय केळकर उपस्थित होते.
गोपीनाथ मुंडे यांच्या मतदार संघातील असुनही कुलकर्णी यांनी स्वतः पेहराव केलेल्या फडणवीसी पोशाखाचा उल्लेख करून महाराष्ट्राच्या राजकारणाची सद्यस्थिती ही ‘मोदी’ मय असल्याचे स्पष्ट केले. मोदी मुख्याध्यापक असतील तर फडणवीस त्यांचे लाडके मॉनिटर आहेत. तेव्हा, महाराष्ट्रातील आतापर्यतच्या फोडाफोडीत ‘काका’ आघाडीवर राहिले असले तरी दोन … दोन पक्ष घाऊकरित्या फुटु शकतात हे या ‘मॉनिटरनेच दाखवुन दिले. इतकेच काय तर ठाण्यात एकाला ‘मोठ्ठा’ केला आणि दुसऱ्याला एकदम ‘छोटा’ केल्याचा टोला आव्हाडांचा नामोल्लेख टाळुन त्यांनी लगावला.
पुढे बोलताना त्यांनी, मोदीच येणार ; मोदीच येणार… हा घोषा भंपक असून इथेच खरा धोका आहे. हे त्यांनी मतांचे गणित मांडुन सोदाहरण स्पष्ट करताना हिंदुत्व मानणाऱ्यांना सावध केले. महाराष्ट्राला जाती पातीत नासवण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्र अराजकतेच्या संघर्षाच्या उंबरठ्यावर आहे. महाराष्ट्रात आज जे घडतेय ते फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांना खाली खेचण्यासाठी नाही. तर हे तिघे मोदींच्या मागे उभे राहिल्याने आधी यांना संपवले की, आपसुकच मोदींचा शक्तीपात होईल. अशा रितीने विरोधकांच्या मोहिमा सुरू आहेत, अल्पसंख्यांक तसेच विरोधी मतांचे एकत्रिकरण केले जात असल्याचे कुलकर्णी म्हणाले. महाराष्ट्रात हा धोका वाढत आहे. तेव्हा तुम्ही कोणत्याही जातीचे असा जोपर्यत हिंदु म्हणुन विचार करणार नाहीत, हिंदु म्हणुन झाडुन मतदानासाठी बाहेर पडणार नाहीत. तोपर्यत या राज्याला या देशाला तुम्ही उभे करू शकणार नाहीत. ज्यांना याची जाणीव झालीय त्याने अन्य एका कुटुंबाला याची जाणीव करून देण्याचे आवाहन कुलकर्णी यांनी केले.