लोखंडी सळ्यांची चोरी, पालिका करणार पोलिसांकडे तक्रार
ठाणे : कळव्याच्या ब्रिटीशकालीन खाडीपुलाच्या लोखंडी सळ्या आणि साहित्य चोरांकडून लंपास होऊ लागले असून पूल कमकुवत होऊ लागला आहे. पालिका प्रशासन याबाबत पोलिसांकडे तक्रार करणार आहे.
ठाणे आणि कळव्याला जोडणारा कळवा खाडीवरील पहिला ब्रिटीशकालीन पुल हा खुप महत्वाचा मानला जात होता. सुमारे दिडशे वर्षापूर्वी ब्रिटीशांनी हा पुल उभारला होता. दगडांचा वापर करुन हा पुल उभारण्यात आला होता. वरील बाजूस लोखंडी साहित्य आणि इतर साहित्याचा वापर करण्यात आला होता. परंतु काही वर्षापूर्वी या पुलाच्या खालील बाजूस असलेले बुरुज पडू लागल्याने हा पुल सुरवातीला मोठ्या वाहनांसाठी बंद करण्यात आला होता. त्यानंतर हा पुल छोट्या वाहनांसाठी देखील बंद करण्यात आला. त्यानुसार मागील आठ ते दहा वर्षापासून हा पुल वाहतुकीसाठी बंद असून येथून फक्त पादचारी जातांना दिसतात.
या पुलाच्या बाजूला पालिकेच्या माध्यमातून दुसरा पुल उभारण्यात आला असून तिसऱ्या पुलाचेही काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे ब्रिटीशकालीन पुल दुर्लक्षित झाला आहे. पुलाच्या वरील बाजूस अनेक ठिकाणी खोदकाम करण्यात आलेले आहे. तसेच बाजूचे संरक्षक कठडे फोडले गेल्याचे दिसत असून तेथील लोखंड चोरीला गेल्याचेही दिसत आहे. खोदकाम करण्यात येत असल्याने हा पुल आणखी कमकवुत होऊ लागल्याचे चित्र आहे.
रात्रीच्या सुमारास येथे गर्दुल्ले येत असल्याने त्यांच्या माध्यमातून हे काम केले जात असल्याचे कळते. याबाबतची माहिती घेण्याचे काम सुरू करण्यात आले असून पोलिसांकडे तक्रार करण्यात येईल, असे नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांनी सांगितले.