ठाणे : ठाण्यातील राज ठाकरे यांच्या सभेत त्यांना तलवार भेट देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना चौकशीकरिता नौपाडा पोलिसांनी 6 मे ला बोलावणे धाडले आहे. त्यावरून पुन्हा एकदा मनसे आक्रमक भूमिका घेण्याची श्यक्यता व्यक्त केली जात आहे.
मनसेचे नेते राज ठाकरे यांनी ठाण्यात सभा घेतली होती. त्यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, शहर अध्यक्ष रविंद्र मोरे, महिला अध्यक्ष समीक्षा मार्कंडे यांनी त्यांचे स्वागत करताना श्री. ठाकरे यांना तलवार भेट दिली होती. ती त्यांनी उपस्थित समुदायाला दाखवली होती, त्यामुळे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह अविनाश जाधव, रविंद्र मोरे यांच्या विरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार महेश महाले यांनी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या चौकशीकरिता ठाण्यातील पदाधिकाऱ्यांना आज पोलिसांनी चौकशी करण्यासाठी नोटीस बजावली आहे.
राज ठाकरे आणि पदाधिकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने मनसे कार्यकर्ते संतप्त झाले होते. आत्ता चौकशीकरिता बोलाविण्यात आल्याने पुन्हा एकदा ठाण्यातील वातावरण तापण्याची श्यक्यता व्यक्त केली जात आहे.