कळवा रुग्णालयात अतिरिक्त २५ रुग्णशय्या
ठाणे : कोविडबाधित रुग्णांची संख्या वाढणे सुरू झाल्यापासून आतापर्यंत पाच कोविडबाधितांचा मृत्यू झाला आहे. हे मृत्यू सहव्याधी असलेल्या रुग्णांचे असून यापुढे रुग्णांच्या मृत्यूचे ‘ऑडिट’ करण्याच्या सूचना पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिल्या आहेत.
आयुक्त अभिजित बांगर यांनी आरोग्य विभागाची एक बैठक घेऊन शहरातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. या आढावा बैठकीमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी राखीव असलेल्या विशेष वॉर्डबरोबरच आणखी २५ रूग्णशय्यांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर, रुग्ण संख्या आणि खाजगी हॉस्पिटलमधील कोरोना रुग्ण यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.
सध्या ठाण्यात कोरोनाचे एकूण २५२ रुग्ण आहेत. कोविडबाधित रुग्णांची संख्या वाढणे सुरू झाल्यापासून ५ कोविडबाधितांचा मृत्यू झाला आहे. याबद्दल तज्ज्ञांचे मत घेतले असता असे दिसून येते की, ज्येष्ठ नागरिक, उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, इतर गंभीर सहव्याधी यांच्यासह कोविडमुळे या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, रुग्णांच्या मृत्यूचे ऑडिट करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. नागरिकांनी कोविड सदृश लक्षणे असतील तर आजार अंगावर काढू नये. तसेच, ज्येष्ठ नागरिक, व सहव्याधी असलेल्या रुग्णांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन आयुक्त बांगर यांनी केले आहे.
चाचणी केंद्रे एकही दिवस बंद ठेवू नयेत. त्याचबरोबर, सार्वजनिक ठिकाणे, मार्केट, रेल्वे स्टेशन, मॉल आदी ठिकाणी चाचणीची व्यवस्था तत्काळ करावी, ऑक्सीजन साठा, चाचणीच्या किट्सची पुरेशी उपलब्धता, औषधांचा पुरवठा यांच्याबद्दल काटेकोरपणे दक्ष राहावे, असेही आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले.
या बैठकीला अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त मनीष जोशी, वैद्यकीय अधिकारी डॉ. राकेश बारोट, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अनिरुद्ध माळगांवकर, उप वैद्यकीय अधिकारी डॉ. स्मिता हमरजकर, डॉ. प्रशिता क्षीरसागर, डॉ. प्रसाद पाटील, डॉ. राणी शिंदे, डॉ. मिलिंद उबाळे आदी उपस्थित होते.