ठाण्यात १२ तासांचा होणार शटडाऊन

झोनिंग पद्धतीने होणार पाणीपुरवठा

घोडबंदर पट्ट्यात सकाळी ९ पासून तर शहरात रात्री ९ नंतर पाणीपुरवठा बंद राहणार

ठाणे : शहरासह विशेष करून घोडबंदर पट्ट्यात आधीच पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले असताना आता भातसा धरणाच्या दरवाजांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ठाणे शहरासह संपूर्ण घोडबंदर पट्ट्यात १२ तासांचा शटडाउन घेण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यामुळे घोडबंदर पट्ट्यात सकाळी ९ ते रात्री ९ तर ठाणे शहरात रात्री ९ ते सकाळी ९ वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या तांत्रिक बिघाडामुळे ठाणे शहराला मिळणाऱ्या एकूण पाणीपुरवठ्यामधून १०० एमएलडी पाणी कमी मिळणार असल्याने हा १२ तासांचा शटडाऊन घ्यावा लागणार आहे. त्यामुळे झोनिंग पद्धतीने पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

भातसा धरणाच्या पाणी सोडण्याच्या दरवाजांवर तांत्रिक बिघाडामुळे पुढील दोन दिवस ठाणे शहरातील पाणी पुरवठा कमी दाबाने व अपुरा होणार असल्याचे मंगळवारी उशिरा पालिका प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले होते. शहरास पाणी पुरवठा करणा-या भातसा धरणाच्या पाणी सोडण्याच्या दरवाजांवर तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने धरणातून होणारा पाणीपुरवठा ५० टक्क्यांनी कमी झाला आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासून पिसे बंधारा येथील पाण्याची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे तब्बल १२ तासांचा शटडाऊन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हा शटडाऊन करताना ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजने अंतर्गत उपलब्ध होणारा कमी पाणी पुरवठा व स्टेम प्राधिकरणामार्फत होणाऱ्या पाणी पुरवठयाचे झोनिंग करुन ठाणे महानगरपालिका क्षेत्रात वितरित करण्यात येणार आहे. त्यानुसार गुरुवार पासून दररोज सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत घोडबंदर रोड, माजिवडा, मानपाडा, बाळकुम, कोलशेत, हिरानंदानी इस्टेट, ढोकाळी, वाघबिळ, ब्रम्हांड, विजयनगरी, गांधीनगर, कासारवडवली, ओवळा, सिद्धांचल, सुरकुरपाडा व उन्नती या भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे तर गुरुवारी रात्री ९ पासून ते सकाळी ९ वाजेपर्यंत दररोज ईटरनिटी, जॉन्सन, समता नगर, सिद्धेश्वर, दोस्ती, आकृती, कळवा, मुंब्रा, जेल, साकेत, ऋतुपार्क व रुस्तमजी या भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी किमान १ आठवड्याचा कालावधी लागण्याची शक्यता असून त्यादृष्टीने आता नागरिकांना पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. पाणी पुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा व ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.