कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक १ वरील एक्सीलेटरच्या बाजूला एका बेवारस बॅगमध्ये ५४ जिलेटीनच्या कांड्या सापडल्याने खळबळ उडाली. जिलेटीन असलेली बॅग आली कुठून याबाबत रेल्वे पोलीस, शहर पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे.
प्राथमिक सूत्राकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी ११ ते साडे अकराच्या सुमारास सफाई कर्मचाऱ्यास एक्सीलेटरनजीक एक बेवारस बॅग आढळल्याने त्याने याबाबत रेल्वे पोलिसांना माहिती दिली. रेल्वे पोलिसांनी श्वान पथकासह त्या ठिकाणी पोहचत तपासणी केली असता बेवारस बॅगेत ५४ डिटोनेटर असल्याचे आढळल्याने पोलीस यंत्रणा तपासाच्या कामाला लागल्या.
मध्य रेल्वेचे पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांना माहिती दिली की, कल्याण स्टेशन पश्चिम साईटला ५४ डिटोनेटर इलेक्ट्रीकल सापडले असून विहिरी, खदानीमध्ये ब्लास्टसाठी हे डिटोनेटर वापरले जातात. खाजगी सफाई कर्मचाऱ्याने माहिती दिल्याप्रमाणे बुधवारी घटनेबाबत माहिती मिळताच पोलिसांनी त्या ठिकाणी पोहोचले. या डिटोनेटरचा स्फोट होण्याची शक्यता नाही. कारण फक्त डिटोनेटर होते. स्फोट होण्यासाठी लागणारी स्फोटके नव्हती. सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरू असल्याचे पाटील यांनी सांगितले. दरम्यान या घटनेमुळे कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात एकच खळबळ उडाली होती.