ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावरील विवियना मॉल जवळ एका चार चाकी वाहनांने दुभाजकाला धडक दिली. या अपघातात जीवितहानी झाली नाही, मात्र ऐन सकाळीच हा प्रकार घडल्याने महामार्गावर सकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
रविवारी सकाळी ६:२७ मुंबई-नाशिक महामार्गावरील जस्ट इन टाईम शॉप समोर, विवियाना मॉलजवळ, मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या वाहिनीवर इर्टिगा या वाहनाच्या मागून येणाऱ्या टाटा कंपनीच्या डंपरने धडक दिली. हा डंपर रेतीने भरलेला होता. इर्टिगा गाडीला मागून धडक दिल्याने गाडी दुभाजकाला धडकून अपघात झाला. अपघाताची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळाल्यानंतर घटनास्थळी पोलीस कर्मचारी, वाहतूक पोलीस कर्मचारी, हायड्रा मशीन, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी पिकअप वाहनासह, ठामपा घनकचरा विभागाचे कर्मचारी उपस्थित होऊन त्यांनी तत्काळ बचाव कार्याला सुरुवात केली.
इर्टिगा गाडीतून वाहनचालक व चार प्रवासी प्रवास करत होते. मात्र अपघात झाल्यानंतर हे सर्व प्रवासी गाडीमधून उतरून निघून गेले. दुभाजकाला धडक दिल्याने रस्त्यावर पडलेले दुभाजकाचे रॅबिट आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व घनकचरा विभागाचे कर्मचारी यांनी रस्त्याच्या एका बाजूला केले. मात्र तोपर्यंत महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे मुंबईकडून नाशिककडे जाणारी वाहतूक धिम्या गतीने सुरू होती.
घटनास्थळी अपघातग्रस्त दोन्ही वाहने पोलिस कर्मचारी व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांच्या मदतीने रस्त्याच्या एका बाजूला करण्यात आल्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत करण्यात आला.