ठाणे : राज्यातील धरणसाठा आता 38.95 टक्क्यांवर आला आहे. तर पुणे, छत्रपती संभाजीनगर, कोकण, विदर्भातील सर्व मोठ्या धरणांचा पाणीसाठा झपाट्याने खाली येऊ लागला आहे. ठाणे-मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तानसा, भातसा, मोडकसागरमध्ये जवळपास ३० टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याचे कळते.
महाराष्ट्राच्या सहा महसूल विभागांपैकी पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या तीन विभागातील धरणांमध्ये 40 टक्क्यांहूनही कमी पाणी शिल्लक आहे. पुणे विभागात राज्यातील सर्वात कमी पाणीसाठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत काही टक्क्यांनी पाणीसाठा अधिक असला तरी काही प्रमुख धरणे एप्रिलच्या मध्यावरच मायनसच्या दिशेने वाटचाल करू लागली आहेत. त्यामुळे शेतीच्या पाण्यासह पिण्याच्या पाण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या वर्षी याच सुमारास पाणीसाठा 33.62% एवढा होता. तो यंदा 38.95% एवढाच राहिला आहे.
कोकण विभागात गेल्या वर्षी 47.68 टक्के पाणीसाठा होता. यंदा त्यात 48.41टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ठाणे आणि मुंबईसह काही शहरांना तानसा, भातसा, मोडकसागर या प्रमुख मोठ्या धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. मात्र या तिन्ही धरणांमध्ये एक आठवड्यापूर्वी ३३ टक्केच पाणीसाठा होता. यात आता आणखी घसरण झाली आहे. त्यामुळे पाण्यासाठी एकीकडे मुंबईची ओढाताण होत असल्याने महापालिकेने अतिरिक्त पाण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आधीच शहापूर आणि ग्रामीण भागात सुरू असलेली पाणी टंचाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्याचा एकूण प्रभाव ठाणे शहरावर पडणार असून येत्या काही दिवसांत शहरात पाणी कपातीचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
ठामपा आयुक्तांचे आदेश धाब्यावर
पाणी टंचाईचे संकट ओळखून ठाणे महापालिकेने पाणी जपून वापरण्याचे आणि अपव्यय टाळण्याचे आवाहन नुकतेच केले आहे. वाहनांची धुलाई करणाऱ्या सर्व्हिस सेंटरवाल्यांनाही सेंटर बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आदेशाचा भंग करणाऱ्या सेंटरवर कडक कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. मात्र त्यानंतरही या सेंटर चालकांनी आदेश धुडकावून लावल्याचे दिसत आहे. सावरकरनगर नाका येथील सेंटर्स पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर करत असून पाचपाखाडी, मानपाडा, गोकुळनगर, चरई, कळवा आदी अनेक ठिकाणी असलेल्या सर्व्हिस सेंटरवाल्यांनी आयुक्तांचे आदेश धाब्यावर बसवून वाहनांची धुलाई कायम ठेवली आहे.