काँग्रेस-समाजवादी यांच्यात अजूनही अंतिम तोडगा नाही

आरएलडीचे नेते अस्वस्थ

नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. मात्र अद्याप विरोधकांच्या इंडिया आघाडीत जागावाटपावर तोडगा निघालेला नाही. पश्चिम बंगाल, पंजाब, उत्तर प्रदेश या राज्यांत जागावाटपाचे नेमके सूत्र अद्याप ठरू शकलेले नाही.

लोकसभा निवडणुकीसाठी महत्त्वाचे असलेल्या उत्तर प्रदेश या राज्यात तर परिस्थिती फारच बिकट झाली आहे. इंडिया आघाडीतील काँग्रेस आणि समाजवादी पार्टी यांच्यातील जागावाटपावर तोडगा निघत नसल्यामुळे समाजवादी पार्टीशी युती केलेल्या राष्ट्रीय लोक दल (आरएलडी) पक्षामध्ये सस्वस्थता निर्माण झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून आरएलडी आणि समाजवादी पार्टी या दोन पक्षांत जागावाटपावर चर्चा चालू होती. १९ जानेवारी रोजी या दोन्ही पक्षांतील चर्चा यशस्वी ठरली आणि समाजवादी पार्टीने आरएलडीला लोकसभा निवडणुकीसाठी एकूण सात जागा देण्याची तयारी दाखवली. त्यानंतर आरएलडीचे प्रमुख जयंत चौधरी आणि समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव या दोन्ही नेत्यांनी या युतीची घोषणा केली. आरएलडीला सात जागा देण्याचे ठरलेले असले तरी या सात जागा कोणत्या असतील हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे. याच कारणामुळे निवडणुकीच्या शर्यतीत असणाऱ्या आरएलडीच्या नेत्यांना तयारीला लागावे की नाही? याबाबत स्पष्ट आदेश मिळालेले नाही. परिणामी या नेत्यांमध्ये सध्यातरी अस्वस्थता निर्माण झाली आहे.

काँग्रेस आणि समाजवादी पार्टी या दोन पक्षांत जागावाटपावर चर्चा चालू असल्यामुळे नेमक्या कोणत्या जागा आरएलडीला द्यायच्या, यावर समाजवादी पार्टी आणि आरएलडी यांच्यात एकमत होऊ शकलेले नाही. त्यामुळे आरएलडीला निवडणुकीची तयारी करण्यास अडचण येत आहे. लवकरात लवकर जागावाटप व्हावे असा आग्रह आरएलडीकडून केला जात आहे.

आरएलडीच्या आणखी एका नेत्याने जागावाटपावर भाष्य करताना काही जागांवर आमच्यात एकमत झाले आहे, असे सांगितले. “बाघपत आणि मथुरा हे दोन मतदारसंघ आमच्या वाट्याला येतील, याचा आम्हाला विश्वास आहे. मिरत, मुझफ्फरनगर, नगिना, आग्रा, हाथरस या जागाही आम्हाला मिळतील अशी आम्हाला आशा आहे. याच परिस्थितीमुळे आमच्या उमेदवारांमध्ये धाकधूक आहे,” असे या नेत्याने सांगितले.

समाजवादी पार्टीने जाहीर केली पहिली यादी
दरम्यान दुसरीकडे काँग्रेस आणि समाजवादी पार्टी यांच्यातील जागावाटपाच्या चर्चेतून अद्याप तोडगा निघालेला नाही. एकीकडे ही चर्चा चालू असताना दुसरीकडे समाजवादी पार्टीने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण १६ उमेदवारांची नावे आहेत. तर आम्ही काँग्रेसला ११ जागा देऊ असे समाजवादी पार्टीने एकतर्फी निर्णय घेऊन टाकलेला आहे. यामुळेदेखील या दोन्ही पक्षांतील चर्चेला अंतिम स्वरुप मिळालेले नाही. समाजवादी पार्टीने १६ उमेदवार जाहीर केल्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.