ठाणे जिल्ह्यात यंदा पाणी कपात नाही

मार्च अखेरीच बारवी धरणात ५० टक्के पाणी साठा

ठाणे : तांत्रिक अडचणी आणि दुरुस्तीमुळे अर्ध्या ठाणे शहरात १५ टक्के पाणीकपात जाहीर करण्यात आली असली तरी बारवी धरणात मार्च अखेरीस ५० टक्के पाणीसाठा असल्याने एमआयडीसीमार्फत होणाऱ्या पाणी पुरवठ्यात कोणतीही कपात होणार नाही. त्यामुळे ठाणेकरांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.

ठाणे जिल्ह्यातील बहुतांश भागाला बारवी धरणातून पाणी पुरवठा केला जातो. यात ठाणे, मीरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर या महापालिकांसह अंबरनाथ नगरपालिका आणि ग्रामपंचायतीचा समावेश आहे. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर, अंबरनाथ, डोंबिवली, ठाणे येथील औद्यागिक क्षेत्रालाही बारवी धरणातून पाणी पुरवले जाते. त्यामुळे बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरणे आवश्यक असते. यंदाच्या वर्षात सप्टेंबर महिन्यात बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. त्यामुळे जिल्ह्याला अविरत पाणी पुरवठा सुरू होता. आता मार्च महिन्याचा अखेरीस याच बारवी धरणात ५० टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे.

बारवी धरणाची क्षमता ३३८.८४ दशलक्ष लीटर इतकी आहे. ३० मार्च रोजी धरणात १७०.६१ दशलक्ष लीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे धरण एकूण क्षमतेच्या ५०.३६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षात कोणतीही पाणी कपात लागू केली जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना पाणी दिलासा मिळाला आहे. गेल्या वर्षात बारवी धरणात ३० मार्च रोजी तब्बल ५४ टक्के इतका पाणीसाठा होता. तर धरणात एकूण १८५.९० दशलक्ष लीटर पाणीसाठा उपलब्ध होता. यंदा गेल्या वर्षात तुलनेत ४ टक्के कमी पाणीसाठा आहे. मात्र तरीही यंदाही कोणतीही पाणीकपात करण्याचे नियोजन नसल्याचे जलसंपदा विभागाने सांगितले आहे.