डॉक्टरकडे जाण्याची गरजच लागायला नको

डॉ. महेश बेडेकर यांच्या आरोग्यविषयक टिप्स

ठाणे: ‘ग…गप्पांचा’ या कार्यक्रमाचे २० वे पुष्प ठाण्यातील ख्यातनाम डॉ. महेश बेडेकर यांनी गुंफले.

या गप्पांदरम्यान डॉ. महेश यांच्या बहुआयामी व्यक्तीमत्वाची ठाणेकरांना ओळख झाली. डॉ. महेश हे एक स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत, त्याचबरोबर ते अतिशय उत्तम, यशस्वी मॅरेथॉन धावपटू आहेत आणि सामाजिक आरोग्यासाठी झटणारे एक सामाजिक कार्यकर्ते देखील आहेत.
त्यांच्या सांगण्यानुसार तुमचा आहार योग्य प्रमाणात, योग्य वेळेत नसेल तर तुम्ही कितीही व्यायाम, योगा केलेत तरी त्याचा उपयोग नाही तसच तुम्ही आहाराच्या चांगल्या सवयी अंगी बाणल्यात तर व्यायामाची गरज पडणार नाही. एकूणच त्यांचा रोख साधी, नियमित जीवनशैली आचरून निरोगी रहावे याकडे होता.

कोरोनाच्या काळात त्यांनी एकही दिवस इस्पितळ बंद ठेवले नाही आणि त्याचे सर्व श्रेय त्यांच्या कुटुंबियांचे आणि १०० जणांच्या कर्मचारी वर्ग व त्यांच्याही कुटुंबियांचे आहे असे सांगितले. डॉ. महेश यांनी भारतातील अनेक प्रसिद्ध मॅरेथॉन स्पर्धांबरोबरच “वर्ल्ड मेजर मॅरेथॉन” च्या सहाही मॅरेथॉन यशस्वीरित्या पूर्ण करून त्याचे मेडल मिळवले आहे. आता यापुढील त्यांचे लक्ष्य जून महिन्यात द. आफ्रिकेत होणाऱ्या कॉम्रेड मॅरेथॉन (९० किमी.) पूर्ण करणे हे आहे.

डॉ. महेश ह्यांनी सामाजिक आरोग्याच्या काळजीतून अनेक चुकीच्या गोष्टीविरोधात न्यायालयीन लढे दिले आहेत. शहरांमध्ये शांतताक्षेत्रांची नोंदणी करून तेथे आवाजाची पातळी कमी ठेवणे, फेरीवाल्यांसाठी विशिष्ट भाग राखून इतर ठिकाणी त्यांना मज्जाव करणे, उत्सवांच्या बदलत्या असामाजिक स्वरूपाला कायद्याने रोखणे, खेळाच्या मैदानावरील आक्रमण थांबवणे तसेच ईव्हीएम मशीनमध्ये “NOTA” चा अंतर्भाव करून घेणे या सर्व बाबतीत डॉ.महेश यांनी जनहित याचिका दाखल करून आणि त्यासाठी प्रचंड मेहनत घेऊन सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. शासन आणि प्रशासनच सर्व काही करेल असे गृहीत न धरता नागरिकांनी स्वतःहून व्यवस्थेत लक्ष घालून चांगल्या बदलांसाठी प्रयत्न करावेत असे डॉ. महेश ह्यांनी सांगितले. त्यांनी थोडक्यात त्यांच्या संस्थेच्या शिक्षण क्षेत्रातील घडामोडींचा देखील आढावा घेतला.