कडोंमपा हद्दीत रस्त्यांवर खड्डेच खड्डे

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात अंतर्गत रस्त्यांची पावसाळ्यात चाळण झाली आहे. कल्याणमधील गोविंदवाडी बायपास ते दुर्गाडी चौक, सहजानंद चौक,  नेतिवली ते चक्की नाका, तिसगाव, डोंबिवली ठाकुर्ली चोळेगाव रस्ता, डोंबिवली पश्चिमेकडील गणेश नगर, बावनचाळ, २७ गावातील अंतर्गत रस्त्यांची यंदाच्या पावसात अक्षरशः दुरवस्था झाल्याचे दिसून येत आहे.

या रस्त्यांवर खड्ड्यांची जणू स्पर्धा पाहायला मिळत असून या खड्डेमय रस्त्यातून वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनेक अपघात या खड्ड्यांमुळे होत आहेत. दरवर्षी पालिकेकडून पावसाळ्याआधी रस्त्याची डागडुजी केली जाते. कोट्यवधी रुपये हे खड्डे बुजविण्यासाठी खर्च केले जातात मात्र पुन्हा परिस्थिती जैसे थे होते. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

याबाबत शहर अभियंता सपना कोळी यांनी शहरात रस्तादुरुस्तीचे काम सुरू असल्याचे सांगितले. येत्या सात ते आठ दिवसांमध्ये खड्डे बुजवण्यात येतील असेही त्या म्हणाल्या.