श्रीरंग शिक्षण संस्थेच्या उर्जा विज्ञान प्रदर्शनाचे दमदार उद्घाटन
ठाणे: आम्हाला सोयी-सुविधा मिळाल्या असत्या तर आम्हीही वैज्ञानिक झालो असतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ खगोल अभ्यासक आणि पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक केले.
ठाण्यातील श्रीरंग शिक्षण संस्थेच्या श्रीरंग विद्यालयाने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी उर्जा २०२४ विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. प्रदर्शनाचे उद्धघाटन मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष व ज्येष्ठ खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांच्या हस्ते पार पडले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी आमदार निरजंन डावखरे, श्रीरंग शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मिलींद बल्लाळ, माजी कुलगुरु श्रीरंग शिक्षण संस्थेचे संचालक संजय देशमुख, सचिव प्रमोद सावंत, नामदेव मनगूडे, आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना श्री.सोमण म्हणाले, ठाणे महापालिकेच्या शाळांतील ४० विद्यार्थी संशोधनासाठी इस्त्रो येथे जाणार असून यासाठी ठाणे महानगरपालिका प्रयत्न करत आहे, हे कौतुकास्पद आहे.
प्रदर्शनाचे यंदाचे पाचवे वर्ष असून या वर्षी जैव विविधता या विषयावर आधारित विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात ठाणे तसेच आसपासच्या परिसरातील ६४ शाळा सहभागी झाल्या असून हे प्रदर्शन १ ते ४ फेब्रवारीपर्यंत असणार आहे. २ फेब्रुवारी हा दिवस विश्व आर्द्रभूमि दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त पाणथळभूमीमध्ये असणारे पक्षी व प्राणी याबद्दलचे प्रदर्शन तसेच दुर्मिळ टेरेस्ट्रियल पक्षांचे छायाचित्र प्रदर्शन पर्यावरण दक्षता मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
श्रीरंग विद्यालयाच्या माध्यमातून दर वर्षी विद्यार्थ्यांच्या प्रतिभांचे प्रदर्शन करण्यासाठी हा मंच उभारण्यात येतो. यंदा उर्जा कार्निव्हल प्रदर्शन भरविण्यात येत असून मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले आहेत. हे प्रदर्शन नागरीकांसाठी विनामूल्य असून जास्तीत जास्त नागरीकांनी प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन यावेळी श्रीरंग विद्यालय शिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात आले.
शहराला मोठ्या प्रमाणात खाडी किनारपट्टा लाभला असून या संदर्भात श्रीरंग विद्यालयात आयोजित प्रदर्शनात जैवविविधता हा विषय विद्यार्थ्यांनी प्रदर्शन स्वरूपात मांडला आहे. जास्तीत जास्त नागरीकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन श्रीरंग विद्यालय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मिलींद बल्लाळ यांनी केले.