युवकाला बेदम मारहाण करीत विवस्त्र धिंड

ठाणे : कळव्यामध्ये एका अल्पवयीन युवकाला कपडे काढून गंभीर मारहाण करत त्या परिसरातील बाजारपेठेत फिरवले. या मारहाणीचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे. ही मारहाण एका दुकलीने केली असून उसने घेतलेले पैसे परत करण्यास नकार दिल्याने करण्यात आल्याचे कळते.

जखमी युवकाने केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी मारहाण करणाऱ्या तौसिफ खानबंदे या तरुणाला अटक केली असून त्याचा मित्र सामिल खानबंदे हा पसार झाला आहे. जखमी युवक ज्या सोसायटीत राहतो, तेथे मंगळवारी दुपारी तौसिफ आणि त्याचा मित्र सामील हे दोघे आले. त्यावेळी तौसिफ याने जखमी युवकाला तू माझ्या घरी येऊन ब्लुटुथ हेडफोन घेऊन का गेलास ‘असे बोलून शिवीगाळी केली. याचदरम्यान तौसिफने युवकाने घेतलेले ३०० रूपये मागु लागला. त्यावेळी युवकाने तुला पैसे देणार नाही असे सांगितले. याचाच राग मनात धरून तौसिफ याने अणकुचीदार हत्याराने युवकाच्या डाव्या पायाच्या गुडघ्याखाली मारले तसेच त्याचा मित्र सामिल यानेही त्या युवकाला मारहाण केली. दोघांनी मिळुन युवकाचा शर्ट काढला आणि पॅन्ट देखील उतरवली. त्यानंतर त्यांनी मारहाण करत त्याला बाजारपेठेत फिरवले.

या मारहाणीचा व्हिडीओ सामील याने बनवला. तर जखमी युवकाने झालेला प्रकार कळवा पोलिसांना सांगितल्यावर याप्रकरणी बुधवारी पहाटेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर मारहाण करणाऱ्या तौसिफ याला सकाळी राहत्या घरातून अटक केली. मात्र त्याचा मित्र पसार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.