टिटवाळ्यातील युवक अनुभवणार स्काय डायव्हिंगचा थरार

कल्याण : ठाणे जिल्ह्यात टिटवाळा येथील विनायक मार्शल आर्ट्स आणि फिटनेस झोनचे तीन साहसी क्रीडा प्रशिक्षक विनायक कोळी, हरीष वायदंडे आणि गणेश गायकवाड यांची स्काय डायव्हिंगच्या खडतर प्रशिक्षणासाठी निवड झाली असून येत्या 4 जून रोजी ते स्काय डायव्हिंग प्रशिक्षणासाठी परदेशी रवाना होणार आहेत.
स्काय डायव्हिंग हा सर्व साहसी खेळातील अतीउच्च साहसी क्रीडा प्रकार आहे. विमानातून 15 हजार फूट उंचीवरून पॅराशूटच्या साहाय्याने स्वतः उडी मारून सुरक्षित रित्या जमिनीवर उतरणे हे या खेळाचे मुख्य उद्दिष्ट आहे. विमानातून उडी मारल्यानंतर पॅराशूट उघडेपर्यंत किमान 150 ते 200 मीटर प्रती तास इतक्या वेगाने आपण जमिनीकडे येऊ लागतो. त्याच प्रमाणे थ्रीजी इतका गुरुत्वाकर्षणाच्या अवरोधाचा सामना करावा लागतो. या सर्व बाबींचा विचार करून संपूर्ण प्रशिक्षण घेऊन स्काय डायव्हिंग करणारे निवडक लोक या खेळाचा अनुभव प्राप्त करू शकतात.
या प्रशिक्षणासाठी हे तिघे गेल्या एक वर्षापासून तयारी करत असून अडवान्स हाय रोप कोर्स क्लिफ जम्प, बंजी जम्प अशा विविध प्रकारच्या प्रशिक्षणातून मानसिक तसेच शारीरिक क्षमता वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत.
नियमित व्यायाम आणि मानसिक स्वास्थ्य यांच्या जोरावर टिटवाळा येथील हे साहसी क्रीडा प्रशिक्षक साहसी खेळातील सर्वात जास्त चित्तथरारक समजल्या जाणाऱ्या उपक्रमात सहभागी होऊन स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार आहेत. या सर्वांच्या जिद्दीला यथोचित यश मिळावे अशी अपेक्षा समस्त टिटवाळा वासीयांच्या वतीने व्यक्त केली जात आहे.