तरुणाने रील बनवून पुलावरून खाडीत उडी मारली

डोंबिवली : इंन्स्टाग्रामावर रील बनवून एका २५ वर्षीय तरुणाने मोठा गाव माणखोली पुलावरून खाडीत उडी मारल्याची घटना शुक्रवार २३ तारखेला दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पश्चिमेकडील रेती बंदर रोडवरील मोठा गावजवळील खाडीत घडली.

याची माहिती मिळताच विष्णूनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तर अग्निशामक दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी जाऊन शोध कार्य सुरू केले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रोहित मोर्या असे खाडीत उडी मारणाऱ्या तरुणाचे नाव असून तो भिंवडी येथील साईनगर येथील गायत्री मंदिरासमोर कामत घर येथे राहत होता. रोहित दुपारी मित्रासोबत मोठा गाव माणखोली पुलावर रील काढण्यासाठी आला होता. मित्रासोबत रील काढून झाल्यावर त्याने पुलावरून खाडीत उडी टाकल्याचे मित्राने पोलिसांनी सांगितले. त्याने खाडीत उडी का टाकली याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अग्निशमन दल आणि पोलिस यांची संध्याकाळपर्यंत खाडीत शोध मोहीम सुरू होती. अंधार पडल्यानंतर शोध थांबवण्यात आला.